दौंडमध्ये फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २६ रक्तपिशव्यांचे संकलन

दौंड : प्रतिनिधी नवनाथ चव्हाण
महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दौंड शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अजिंक्य मित्र मंडळ आणि अन्विक (बंटी) कांबळे व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात एकूण २६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

दौंड येथील फॉरेस्ट ऑफिस समोर, शालीमार चौक येथे हे शिबिर पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड नगर परिषदेचे लोकप्रिय नगरसेवक वसीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी नगरसेवक अथर्व सरनोत आणि माजी नगरसेवक नितीन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतात रक्तदानाचे महत्त्व विशद करत आयोजकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश कृतीतून मांडत नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी खालील संस्था व व्यक्तींचे मोलाचे योगदान लाभले: रक्तपेढी: पुणे ब्लड बँक व मरुती ब्लड बँक.विशेष सहकार्य: राजू शेख आणि अनिकेत शेठ विधाते.

”रक्तदान हेच खरे जीवनदान आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अशा विधायक उपक्रमातून समाजाचे ऋण फेडण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील.”— आयोजक, अजिंक्य मित्र मंडळ व मित्र परिवार
शहरातील नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून, भविष्यातही अशा सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



