पालघरमध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा वेतनप्रश्न गंभीर… कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर मंडळातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना यांनी अधीक्षक अभियंता, पालघर मंडळ यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ वेतन देण्याची मागणी केली आहे.
अत्यल्प वेतनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हे कर्मचारी कंपनीची जबाबदारी पार पाडत असतानाही त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य वेतन वेळेत मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, मानव संसाधन विभागातील दिरंगाई आणि कंत्राट प्रक्रिया वेळेत पूर्ण न होणे ही या समस्येची प्रमुख कारणे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंडळ कार्यालयाकडून जबाबदारी योग्य प्रकारे पार पडत नसल्यामुळे हा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.
संघटनेने संबंधित कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी केली आहे. यासोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान वेतनप्रश्न लवकरात लवकर न सोडवल्यास कंत्राटी कर्मचारी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीला लागले आहेत.



