विक्रमगड कुंभा डोंगर परिसरात लोकसहभागातून बहरणार निसर्ग.. वैतागवाडी कडून’धरतरी पालथा’ उपक्रमाचे आयोजन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता जपण्याच्या उद्देशाने वयम चळवळीच्या प्रेरनेतून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खुडेद पैकी ग्रामसभा वैतागवाडीमार्फत धरतरी पालथा हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे .
सामूहिक वनहक्क क्षेत्रात येणाऱ्या कुंभा डोंगर परिसरात ‘धरतरी पालथा’ या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण व बिजरोपण करिता श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .वयम् चळवळीच्या प्रेरणेतून उपक्रम निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि डोंगरावरील हिरवळ वाढवण्यासाठी ग्रामसभा वैतागवाडीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. वयम् चळवळीच्या प्रेरणेतून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात काजू, जांभूळ, मोहटी, आंबा यांसारख्या फळझाडांच्या बियांचे रोपण (बीजारोपण) आणि बांबू व इतर औषधी रोपांची लागवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांच्या स्वंयस्फूर्त श्रमदानातून हा संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
या मोहिमेचा मुख्य टप्पा म्हणून शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 10:00वाजल्यापासून ते 12:30 वाजेपर्यंत कुंभा डोंगर क्षेत्रात खड्डे खोदण्याचे काम झाले .त्यानंतर दुपारी 2 वाजता एकत्रित सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला. धरतरी पालथा या कार्यक्रमासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय विक्रमगड येथून वनरक्षक रविंद्र राऊत, प्रदीप भंडारी,धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष मधुकरजी मालकरी, केशवसृष्टी संस्थेचे विक्रमगड विस्तारक गणपतजी धांगडा,दिलीपजी पावरा, जव्हार विस्तारक संजय दाव्हाड,वयम चळवळीचे कार्यकर्ते प्रकाश बरफ ,रविंद्र पवार ,नामदेव टोकरे ,धरतरी ग्रुपचे कार्यकर्ते किरण लोहार, वसंत तुंबडा,अमर गोविंद,तसेच पेसा गाव कातकरीपाडा आणि वांगनपाडा येथील ग्रामस्थ तसेच ग्रामसभा वैतागवाडी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वैतागवाडी ग्रामसभेच्या धरतरी पालथा या उपक्रमामुळे पर्यावरणाप्रती जागरूकतेचा एक नवा आदर्श निर्माण झाला असून, भविष्यात कुंभा डोंगर पुन्हा एकदा फळाफुलांनी बहरलेला पाहायला मिळेल, असा विश्वास वैतागवाडी ग्रामसभेच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.



