महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आजचा तरुण… ज्याच्या हातात भारताच्या महासत्ताक देशाचे स्वप्न अवलंबून आहे

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
सध्या आपण सर्वजण पाहतोय की, संपूर्ण महाराष्ट्रात सत्तासंघर्ष चालू आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष पक्ष, राजकारण, कोर्ट आणि राजकीय नेतेमंडळी यांच्याकडे लागलं आहे. आणि एकीकडे मात्र स्पर्धा परीक्षेची मुलं रस्त्यावर बसली आहेत. तर दुसरीकडे शेतकरी कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारकडे विनंती करीत आहे. आणि मतदार मात्र आपआपल्या कामात आहे. काय चाललंय काय नक्की या आपल्या महाराष्ट्रात..!
संपूर्ण महाराष्ट्र हा या राजकीय वातावरणात ढवळून निघाला आहे. पण सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे येणारी २०२४ निवडणूक होय. कारण काहीही झालं तरी मतदाराचा आवाज हा खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील कित्येक भागात पोटनिवडणुका देखील लागल्या आहे. अगदी पक्षश्रेष्ठींपासून ते अगदी सामान्य कार्यकर्त्यां पर्यंत सर्वजण आपआपला उमेदवार निवडून कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करताना दिसुन येत आहेत. कोणी जनतेला कामे करू म्हणतंय तर कोणी केलेली कामे दाखवून देतंय तर कोणी निवडून आल्यावर बघू म्हणतंय…म्हणून मतदार सुद्धा अडचणीत सापडला आहे. नक्की मतदान करायचं कोणाला? कोण आपला? आणि कोण परका? हेच समजत नाही अलीकडे.
पण लक्षात ठेवा काहीही झालं तरी मतदार खूप हुशार आहेत. सगळं राजकारण एका मतात फिरवण्याची ताकत या मतदार मध्ये आहे याचा नेते मंडळी यांना विसर तर पडला नसावा ना…! एकीकडे राजकीय वर्तुळ पण खूप भारी दिसायला लागल आहे. याच राजकीय वर्तुळात कोणी दुःखात तर कोणी सुखात, तर कोणी चिंतेत तर कोणी गुलालात पहायला मिळतोय. काहीपण म्हणा पण या सर्वात जर कोणी निवांत असेल तर ते म्हणजे छोटे मित्रपक्ष होय.
कारण मोठ्या पक्षांसोबत राहायचं. पाठिंबा द्यायचा आणि निवांत राहायचं. ते म्हणजे अस झालं भोपळ्यात बी खुशाल. या निवडणुकांच्या रणधुमाळी मध्ये सर्वात जास्त चिंतेत असतो तो म्हणजे कार्यकर्ता कारण साहेबांचे आदेश, साहेबांच्या सभा, साहेबांचे कार्यक्रम अस सगळं नियोजन करावे लागत बिचाऱ्याला. तो पण बिचारा कुठला? कोणत्यातरी आशेपोटी, लालसेपोटी मागेपुढे करावं लागतं नाईलाजाने त्यालाही. पण त्या नेत्यांना आणि त्यांच्या साहेबांना त्या सामान्य घरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना कळतील तेव्हाच ना. आयुष्य जात साहेबांच्या मागे पुढे करून पण साहेब बरोबर गरज पडली हाक मारतो आणि गरज संपली की लाथ मारतो.
हे जणू राजकीय वर्तुळातील एक समीकरणच तयार झालं आहे. पण दुसरीकडे आजही आपल्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का न लागू देणारे नेते आहेत. पण महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या मते तरुणांनी या राजकारणाच्या नादाला न लागलेलंच बर. कारण एकदा का वय आणि वेळ निघून गेली की खूप वाईट अवस्था होते.
याच तरुणांच्या हातात भारताच्या महासत्ताक देशाचे स्वप्न अवलंबून आहे. याचा प्रत्येक तरुणाने जाणीवपूर्वक विचार करायला हवा. अस मला वाटते. पण आज महाराष्ट्रात तरुणांच्या बाबतीत मात्र एक वेगळंच चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कोणत्यातरी नेत्यासोबत सेल्फी असतो काढलेला त्यावर रिल्स, स्टोरी , स्टेटस ठेवायचे आणि हवा करायची. माझी किती मोठ्या नेत्यासोबत ओळख आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण त्या ऐवजी एखाद्या उद्योगपतीचा लेख, महत्वपूर्ण दोन आयुष्यासाठी महत्वाच्या ओळी नाहीत ठेवत सोशल मीडियावर किंवा कलावंत, लेखक, शेतकरी, जवान यांचा नाहीत ठेवत काही.
आपल्या आईवडिलांवर फक्त म्हणतो आपण प्रेम आहे पण त्यांचा फोटो तरी असतो का आपल्या गॅलरीत. तुम्हीच सांगा मला. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तरुणांनी यामधून शिकले पाहिजे की, आपण आपल्या करिअर कडे लक्ष द्यायला हवे, व्यवसाय उद्योजक व्हावे, आपल्या स्वप्नांसाठी धडपड करायला हवी, आईवडील यांच्यासाठी काहीतरी करायला हवे, शेतकऱ्यांसाठी, जवानांसाठी काहीतरी करून दाखवा, कायद्याचे शिक्षण घ्या, आपल्या भारत देशाप्रती काहीतरी करून दाखवायला हवे. भारत महासत्ताक बनवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा. पण राजकारणाच्या भोवऱ्यात अडकून स्वतःच आयुष्य वाया घालवू नये. एवढीच मी तुमच्याकडे विनंती करेन. आणि शेवटी एवढंच म्हणेन की,उठ तरुणा जागा हो, महासत्ताक भारत देशाचा धागा हो।
लेखक- महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-उस्मानाबाद.
संपर्क- ९५७९२२८३४७



