विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनवता ‘चांगला माणूस’ घडवा: स्वरूपाराणी मोहिते-पाटील

महर्षि प्रशाला प्राथमिक विभागाचा ‘महर्षि महोत्सव’ उत्साहात संपन्न; बालकलाकारांच्या सादरीकरणाने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने
यशवंतनगर (प्रतिनिधी):कादर शेख
“विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी न बनता आपल्या चांगल्या सवयींतून व्यक्तिमत्व घडवावे. शाळेच्या प्रयत्नांना पालकांनीही साथ द्यावी आणि आपल्या पाल्यांच्या भावनिक विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यांना एक उत्तम नागरिक व चांगला माणूस म्हणून घडवावे,” असे आवाहन महर्षि प्रशाला प्राथमिक विभागाच्या सभापती स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (दिदीसाहेब) यांनी केले.

यशवंतनगर येथील स्मृतीभवनच्या बादशाही रंगमंचावर महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलन तथा ‘महर्षि महोत्सवाच्या’ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांना अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अकलूजचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे साहेब यांनी पालकांना सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले. “मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी अत्यंत सावध राहावे आणि आपल्या पाल्याच्या मोबाईल वापराकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे,” असा मोलाचा सल्ला व सायबर सुरक्षेबाबत पालकांना सतर्कतेचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या महोत्सवात बालवाडी ते चौथीच्या एकूण ३४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.बालगीते, घुमरे गीत, निसर्ग गीत, कोळी गीत, भारुड आणि देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली.’तेरी उंगली पकड के चला’ या पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित सादर केलेल्या गीताला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मराठीसह कन्नड आणि तमिळ गीतांवरील सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली.

मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी प्रशालेचा प्रगती अहवाल सादर केला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील व जयसिंह मोहिते-पाटील (बाळदादासाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळा सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, इयत्ता चौथीतील अथर्व कुदळे, चैताली कदम आणि ओवी घनवट या विद्यार्थ्यांनी आपल्या खास शैलीत केलेल्या निवेदनामुळे सर्वांची वाहवा मिळवली.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे, माता-पालक संघ व शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलाही बागवान यांनी केले, तर आभार रमेश गायकवाड यांनी मानले. ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



