माळीनगर, श्रीहरीनगर येथील जन आंदोलनाला अखेर यशशासन दरबारी कटपॉईंट ( अंडरपास ) ची मागणी मान्य

प्रतिनिधी.. रियाज मुलाणी
मो.9921500780
श्रीहरीनगर व माळीनगर मधील सर्व राहिवाशी यांचा अतिशय आत्मीयतेचा व महत्त्वाचा असा असणारा विषय म्हणजे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरती श्रीहरीनगर या ठिकाणी क्रॉसिंग साठी कट पॉईंट करून मिळावा ( अंडरपास ) हा होता त्यासाठी गेले काही महिने येथील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्यामध्ये महिला,तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक यांनी श्रीहरीनगर या ठिकाणी या मागणीसाठी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचे आव्हान शासनाला करत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होती, त्या आंदोलनास अखेर यश आले आहे.
या गावामध्ये ,सर्व व्यापारीवर्ग गुण्या गोविंदाने राहत होता व्यापारामध्ये समृद्धी होती परंतु हे सर्व सुरळीत चालू असताना माळीनगर गावाला बायपास न घेता गावाच्या मधोमध उड्डाणपूल टाकण्यास संमती दर्शविले आणि इथूनच माळीनगर गावाच्या व्यापारी वर्गाचे व नागरिकांचे हाल सुरू झाले. यामध्ये श्रीहरीनगर या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग पूर्णपणे बंदिस्त स्वरूपाचा तयार होणार होता. व यामुळे येथील सरकारी दवाखान्याची, शाळेतील मुलांची, मयत व्यक्तींची स्मशानभूमी, दफनभूमी, माळीनगर, खंडाळी ग्रामीण मार्ग या सर्वांची गैरसोय होणार होती.याची कल्पना मिळताच खऱ्या अर्थाने श्रीहरीनगर या ठिकाणच्या कट पॉईंट मागणीच्या लढ्याला सुरुवात झाली, प्रथम श्रीहरीनगर येथील रहिवाशी यांच्या सह्यांचे निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना देण्यात आले,
त्यासाठी सर्वांच्या सहमतीने माळीनगर ग्रामपंचायतिचा ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला व तो ठराव संबंधित कार्यालयास पाठवण्यात आला तरीही काही कारणास्तव नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे असे समजतात सर्व नागरिकांची मते घेऊन त्यामध्ये काही रिटायर्ड जेष्ठ नागरिक यांच्या सल्ल्याने आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली, जोपर्यंत आपले श्रीहरीनगर येथील कट पॉईंट चे काम होत नाही तोपर्यंत आपण सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकायचा असे ठरले त्या अनुषंगाने श्रीहरनगर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी साखळी आंदोलनास सुरुवात केली. व संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी खेचून आणले व संबंधित ठिकाणची अडचण व पाहणी करण्यास भाग पाडले व त्यांच्याही लक्षात आले की खरंच नागरिकांची मागणी ही योग्य आहे या ठिकाणचा प्रश्न मार्गी लावणे खरेच गरजेचे आहे त्या अनुषंगाने संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग याचे प्रकल्प अधिकारी यांनी नागरिकांस आंदोलन मागे घेण्यास सांगितले व केंद्राकडे प्रस्ताव पाठवून तुमचे काम लवकरच आम्ही मार्गी लावू असे लेखी आश्वासन दिले व नागरिकांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेतले.
नक्कीच आज हा नागरिकांच्या संयम, एकी, प्रामाणिकपणा, सातत्य, पाठपुरावा व सर्वात महत्त्वाचे प्रशासन आणि नागरिकांमध्ये झालेला सामाजिक सलोखा याचा विजय आहे मा. प्रकल्प अधिकारी यांच्या सांगण्यानुसार सदर नागरिकांची मागणी ही मंजूर झाली असून येत्या डिसेंबर पर्यंत सदर मंजूर कामाचे टेंडर होईल व हे काम नवीन वर्षामध्ये नक्की चालू होईल असे आश्वासन दिले ह्यामुळे सर्व नागरिकांमद्ये आनंदाचे वातावरण आहे.
या लढ्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर, माझी आमदार रामभाऊ सातपुते यांनी शिफारस पत्रे देऊन पाठपुरावा करण्यास मदत केली,माळीनगर असेल माळीनगरच्या आजूबाजूच्या गावातील पक्ष वेगवेगळ्या संघटना संस्था नागरीक तसेच प्रशासनामध्ये काम करणारे परंतु आमच्या आंदोलनाची दखल घेणारे सर्व हितचिंतक या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेचे आंदोलन प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सर्व पत्रकार बांधव मीडिया यांचे खऱ्या अर्थाने तेथील नागरिकांनी आभार मानले आहेत.



