महाराष्ट्र

उद्याच्या नेत्यांचे सक्षमीकरण करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसचा प्रभावशाली प्रवास!

माळीनगर प्रतिनिधी
रियाज मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज
मो. 9921 500 780

इतिहासाच्या अगणित पानांपासून ते आजपर्यंत, भारताचे भविष्य घडवण्यात व उन्नतीच्या दिशेला नेण्यात तरुण पिढीमधील उत्साह, गतिशीलता, सातत्य, नावीन्य, कल्पकता आणि जिद्दीने नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातही ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रस्तरावरती लढा उभारण्यात व तो पूर्णत्वास नेण्यात तरुणांची तळमळ आणि स्वातंत्र्यप्राप्तीचा संकल्प ही प्रेरक शक्ती होती. १९०५ च्या ज्वलंत दिवसांपासून, जेव्हा विद्यार्थी बंगालच्या फाळणी विरोधात उठले होते, ते खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांच्या देशाप्रती केलेल्या प्राण त्यागापर्यंत, तरुणांच्या वीरतेची गाथा राष्ट्राच्या हृदयात अमिटपणे कोरली गेली आहे.

या काळात, प्रांतीय विद्यार्थी परिषद, यंग इंडिया फोरम, ऑल बंगाल स्टुडंट्स असोसिएशन, सेंट्रल प्रोव्हिन्शिअल युथ कॉन्फरन्स आणि नंतर स्टुडंट्स काँग्रेस अशा वेगवेगळ्या नावांनी युवा गटांचे संघटन होत गेले. परंतु युवकांच्या प्रतिभेला व स्वयं प्रेरणेला भारतीय युवक काँग्रेस (IYC) ने एक संरचित व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

१९६० मध्ये स्थापन झालेली भारतीय युवक काँग्रेस आशेचा किरण म्हणून उदयास आली ज्यामुळे तरुणांना त्यांची शक्ती राष्ट्र उभारणीसाठी समर्पित करण्याकरिता संधी उपलब्ध तर झालीच पण त्या सोबतच त्यांच्यातील ऊर्जेला योग्य दिशा सुद्धा मिळाली. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, काँग्रेसमधील एक पुरोगामी शाखा म्हणून भारतीय युवक काँग्रेसची स्थापना करण्यात आली, जी पुढे चालून देशभरातील युवकांना एकत्रित करत हळूहळू स्वयंपूर्ण शक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली.

इंदिरा गांधींसारख्या दिग्गज व दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय युवक काँग्रेसची बांधणी करण्यात आली. सामाजिक कार्यात सहभाग घेणे आणि उजव्या विचारसरणीचा प्रतिकार करणे राष्ट्रीय युवक काँग्रेसची मुख्य उद्दिष्टे होती व आजही आहेत. या नवोदित संघटनेच्या परिवर्तनवादी धोरणांमुळे विविध स्तरांवरील व राज्यांमधील युवक संघटनेशी जोडले गेले. आजही केंद्र व राज्य सरकारमधील महत्त्वाची पदे भूषविणारी अनेक दिग्गज नेते भारतीय युवक काँग्रेसची देण आहे. संघटनेत काम करत असताना समाजातील जनतेच्या समस्यांचा प्रत्यक्ष रुपी अनुभव येतो त्यामुळे विचारातील प्रगल्भता वाढते आणि नेतृत्वाला धार मिळते. साडेचार करोड पेक्षाही जास्त सभासद असलेल्या या संघटनेचे अस्तित्व कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेले आहे.

आपल्या संपूर्ण कार्यकाळात, भारतीय युवक काँग्रेसचे संचालन करणाऱ्या पुरोगामी नेतृत्वांनी तिचा आत्मा जिवंत आणि चैतन्यपूर्ण ठेवला आहे. पहिले निर्वाचित अध्यक्ष प्रिय रंजन दासमुंसी ते विद्यमान अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास यांनी युवाशक्तीचा सदुपयोग करत सामाजिक बदलांना चालना देणे तसेच सरकारच्या अन्यायी धोरणांविरुद्ध आंदोलने करून आवाज उठवण्याचे काम केले आहे.

भारतीय युवक काँग्रेसने स्वतःला सक्रिय राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित ठेवले नाही तर सामाजिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी झोकून दिले. १९७० च्या दशकात, संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय युवक काँग्रेसने असे उपक्रम हाती घेतले ज्यामुळे लोकांच्या मनावरती तिची अमिट छाप उमटली. वृक्षारोपण, कुटुंब नियोजन, घरगुती हिंसाचार,आणि हुंडाबळी सारख्या कुप्रथे विरुद्ध प्रबोधन या मोहिमांनी भारतीय युवक काँग्रेसची भारताच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली वचनबद्धता दर्शविली. परिवर्तनाचे शिलेदार राजीव गांधी यांनी हा वारसा पुढे चालविला. मतदानाचे वय १८ वर्षपर्यंत कमी केले, त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना त्यांचे प्रतिनिधित्व करणारा नेता निवडण्याचा अधिकार मिळाला आणि स्वतःचे भविष्य घडवण्यात अधिक थेट भूमिका सुद्धा मिळाली.

भारतीय युवक काँग्रेसचा इतिहास हा असंख्य संघर्षांचा आणि विजयांचा मिलाप आहे. त्यातील प्रत्येक अध्याय बदल आणि कणखरतेची कथा सांगतो. भारतीय युवक काँग्रेस लोकांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी सातत्याने संघर्ष करत आहे.

आज, दिनांक ९ ऑगस्ट, रोजी आपण भारतीय युवक काँग्रेस दिन साजरा करत असताना, भारताच्या तरुणांच्या आकांक्षांचे तरुणांद्वारे प्रतिनिधित्व करत सतत विकसित झालेल्या संघटनेचे आपण साक्षीदार आहोत. नवी दिल्ली येथे मुख्यालय आणि राज्यांमध्ये मजबूत युवकांच्या सहभागाने भारतीय युवक काँग्रेसचे नेतृत्व समर्पित व्यक्तींनी केले आहे जे सक्षमीकरणाची मशाल पुढे नेत आहेत. घटनात्मक सुधारणांची मागणी करण्यापासून ते भारत-पाकिस्तान सीमेवर सैनिकांच्या हक्कांची बाजू कणखरपणे मांडणारे हे संघटन असंख्य उपक्रमांमधून त्यांची अतूट बांधिलकी प्रतिबिंबित करते.

भारतीय युवक काँग्रेसचा वारसा धैर्य, लवचिकता आणि अटळ समर्पणाचा आहे. उज्वल भविष्याकडे वाटचाल करत असताना, समाजात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी, आव्हानांना संधींमध्ये आणि स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तरुणांच्या आवश्यक असलेल्या सामर्थ्याचा तो पुरावा आहे. या विशेष दिनी आपण भारतीय युवक काँग्रेसला शुभेच्छा देत असताना, आपण तिच्या प्रवासातून प्रेरित होऊ या आणि तरुणांच्या उज्वल आणि अधिक न्याय्य भविष्यासाठी स्वतःला समर्पित करूया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button