सामाजिक

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप धादांत खोटे – प्रमोद अधटराव

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

देवरुख: काल मराठा आंदोलक मनोज जरांगेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर आरोप केल्यानंतर भाजप कडुनही त्याला उत्तर देण्यात आले. आज संगमेश्वर चिपळूण विधानसभा क्षेत्राचे भाजप चे प्रमुख प्रमोद अधटराव यानी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. श्री प्रमोद अधटराव म्हणाले की…. “३१/३२% समाजाला १० टक्के आरक्षण मिळवून देणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस नक्की कशासाठी डोळ्यात खुपत आहेत? आपण उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलत आहोत याचेही भान जरांगे पाटलांचे सुटले आहे. काल तर त्यांची जीभ चांगलीच घसरली आहे. चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या सामाजिक आंदोलनाला आता त्यांनी राजकीय आंदोलन बनवले की काय? अशी शंका यायला लागली आहे. “देवेंद्रजींच्या कारकीर्दीतच मिळालेले आरक्षण नंतर का रद्द झाले? गेल्या सत्तर वर्षात यावर काहीच हालचाल का झाली नाही? आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. त्याला कुठल्याही प्रकारे राजकारणी व्यक्तीशी नेऊन जोडणे हा निव्वळ समाजविघातक डावच वाटत आहे. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या मराठी समाजाला जातीच्या आधारावर फोडण्याचा घातक पायंडा या निमित्ताने पडताना दिसत आहे. मराठा समाजाला सर्वच पातळ्यांवर टिकणारे आरक्षण दिलेल्या देवेंद्रजींविरुद्धची अशी अभद्र भाषा कदापीही सहन केली जाऊ शकत नाही. ती निषेधार्हच आहे. हे आरोप आम्हाला अजिबात मान्य नाहीत. अशा बिनबुडाच्या आरोपांचे कधीही समर्थन होऊच शकत नाही. विशेषत: देवेंद्रजींबद्दल तर नाहीच नाही. संपूर्ण विधानभवनाने एकमताने मंजूर केलेले विधेयकही जरांगेना मान्य नसणे हे नक्की कशाचे लक्षण मानायचे? या सगळ्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहेच. त्यात कुठेतरी खो घालण्याचाच यात हेतू दिसून येत आहे.जरांगे पाटलांनी आंदोलन नक्की करावे. त्यांचा आणि मागास असलेल्या समाजाचा हक्कच आहे”. “पण हे करताना जी व्यक्ती पहिल्या दिवसापासून ठामपणे या आरक्षणासाठी उभी राहून निरपेक्षपणे काम करते आहे त्या फडणवीसजींसारख्या व्यक्तीबद्दल बोलताना जरांगेनी जीभ घसरू देऊ नये”.असा सल्लाही त्यानी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button