माढा लोकसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण आबा पाटील हेच किंगमेकर ठरणार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा दावा

करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदार संघात मोहिते-पाटील,आमदार बबनदादा शिंदे यांचे नंतर एकगठ्ठा मतदान माजी आमदार नारायण पाटील यांच्यामागे असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील हेच किंगमेकर ठरणार असल्याचा ठाम विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला. माढा लोकसभा मतदार संघात आता हालचालींना वेग आला असून राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत.यावर टाइम्स 9 मराठीच्या तालुका प्रतिनिधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील गटाची भूमिका त्यांनी मांडली यावेळी तळेकर यांनी सांगितले की पाटील गटास ७५ हजार मतांचे पाठबळ आहे. आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत एकसंघ राहून या सर्वांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन मतदान केले मग ती निवडणूक ग्रामपंचायतिचा टप्पा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अथवा लोकसभेची असो. यामुळे पाटील गटास आपले शक्ती प्रदर्शन करण्याची तूर्तास कधी भासली नाही.माढा लोकसभा मतदार संघात जनमताचा वाढता पाठिंबा मिळत असलेले नेते म्हणून नारायण पाटील यांची ओळख आहे. पाटील यांना १९९९ मध्ये पहिल्या विधासभा निवडणुकीत १२ हजार ५०० मते पडली, सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ४२ हजार ५०० मते पडली. तर सन २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून येताना ६२ हजार मते मिळाली. सन २०१९ मध्ये शिवसेना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारून सुद्धा नारायण पाटील यांना ७२ हजार मते मिळाली. यावरूनच जनमताचा वाढता आलेख सर्वकाही सांगून जातो. माढा लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील हे ज्या उमेदवाराच्या पाठीशी असतील तोच उमेदवार निवडणूक जिंकणार असल्याचा दावा तळेकर यांनी केला. लोकसभा निवडणुकीची मतदानाची टक्केवारी ही विधानसभा निवडणुकी पेक्षा कमी असते पण यात सुध्दा माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील गट आपले १०० टक्के योगदान देतो. इतर नेत्यांच्या तुलनेत नारायण पाटील हे याबाबत सरस पडतात. तालुक्यात आमदार शिंदे व माजी आमदार बागल या दोन गटापेक्षा पाटील गटास जनतेचा पाठींबा मोठ्या प्रमाणत आहे हे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी पाहून लक्षात येते. महाभारतातील नारायणा प्रमाणे जिकडे नारायण तिकडे विजय हे समीकरण माढा लोकसभा मतदार संघात सुध्दा निश्चित असल्याचा दावा प्रवक्ते सुनील तळेकर यांनी खास आपल्या शैलीत केला.



