लाचखोर तालुका आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात डॉ. नरेंद्र आडे च्या पापाचा घडा भरला २५ हजाराची लाच घेताना मुसक्या आवळल्या
प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
काळी दौलत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र आडे याच्या पापाचा घडा अखेर भरला. आशा वर्करच्या जागेवर पदस्थापना देण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना डॉ. नरेंद्र आडे याच्या मुस्क्या आवळण्याची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. भ्रष्टाचारात अकंठ बुडालेला डॉ. नरेंद्र आडे हा एसीबीच्या जाळ्यात अडकल्यामुळे सोशल मीडियावर जनतेकडून अक्षरशः जल्लोष करण्यात येत असल्याचे चित्र होते. डॉ. नरेंद्र आडे हा काळी (दौलत) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे. याशिवाय त्याच्याकडे काही काळ फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अतिरिक्त प्रभारही होता. तसेच मागील दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून नरेंद्र आडे हा महागाव तालुका आरोग्य अधिकारी या महत्वाच्या पदाच्या प्रभाराची खुर्ची बळकावून बसला होता. अत्यंत चाणाक्ष असलेला डॉ. नरेंद्र आडे याच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा बऱ्याच दिवसापासून जनमानसात चर्चिल्या जात होत्या. माळवागद या गावात आशा वर्कर या पदाच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली होती. या एका जागेसाठी गावातून जवळपास दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सौ. कोमल पृथ्वीराज चव्हाण ही अर्जदार महिला उच्चशिक्षित असून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, तसेच मास्टर ऑफ सोशल वर्कर ही पदव्युत्तर पदवीही घेतल्याचे कळते. बेरोजगारी प्रचंड फोफावल्यामुळे सौ. कोमल चव्हाण यांनी आशा वर्कर पदासाठी अर्ज केला होता, मात्र या पदावर पदस्थापना पाहिजे असल्यास ५० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे यांनी केली होती. सौ. कोमल चव्हाण यांचे चुलत सासरे मोहन सोमला चव्हाण हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, शिवाय ते भाजप तालुका उपाध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहतात. डॉ. नरेंद्र आडे हे आपल्याच समाजाचे असल्यामुळे मोहन चव्हाण यांनी त्यांची भेट घेऊन गुणवत्तेच्या निकषावर कोमल चव्हाण यांची निवड करावी अशी विनंती केली होती, परंतु लाच खाण्याची लत लागलेले डॉ. नरेंद्र आडे यांनी ५० हजार रुपये दिल्याशिवाय या पदावर पदस्थापना मिळणार नाही अशी धमकी मोहन चव्हाण यांना दिली होती. त्यानंतर मोहन चव्हाण आणि कोमलचे पती पृथ्वीराज चव्हाण यांनी यवतमाळ जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली होती. नरेंद्र आडे यांनी मागितलेल्या ५० हजारांपैकी २५ हजाराची पहिली किस्त देण्याचे आज निश्चित झाले होते. त्यानुसार सौ. कोमल आणि पृथ्वीराज चव्हाण हे ठरलेली रक्कम घेऊन सायंकाळी पाच वाजता काळी (दौलत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. डॉ.नरेंद्र आडे यांनी लाचेची ही रक्कम पीएचसी कार्यालयातच बिनधास्तपणे स्वीकारली. यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने डॉ.नरेंद्र आडे यांच्या मुस्क्या आवळल्या. त्यानंतर आरोपीस घेऊन हे पथक चौकशीसाठी पुसद येथील विश्राम गृहात दाखल झाले.
भ्रष्ट प्रभारी अधिकारी करीत आहेत भाजपाची नाचक्कीमहागाव तालुक्यातील गोरगरिबाच्या आरोग्याची जबाबदारी असलेले तालुका आरोग्य प्रशासन मागील दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रभारावर आहे.डॉ.नरेंद्र आडे याच्याकडे दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून तालुका आरोग्य अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. ‘खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आणे’ अशी डॉ. नरेंद्र आडे यांची कामगिरी आहे. आडे यांच्या भ्रष्टाचारा बाबत डिपार्टमेंट मध्ये गोपनीयरित्या चर्चेचे फड रंगतात. महागाव तालुक्यात ५० पेक्षा जास्त बोगस डॉक्टर खुलेआम वैद्यकीय व्यवसाय करत असून या सर्वांचे हप्ते आडे यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचीही चर्चा आहे. आरोग्य विभागाचे कामकाज प्रचंड ढासळले असल्यामुळे, भाजपाचे विद्यमान आमदार नामदेवराव ससाने यांच्या विषयी जनतेमध्ये कमालीची नाराजी आहे. याचा थेट परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत याचे दुरगामी परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतील अशी जनभावना आहे.