“गजरी” मन हेलावून टाकणारा लेख

लेखक प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज मो.नं. :-
9226144836
कालपरवाच मी अकलूज वरून पुण्याकडे ट्रॅव्हल्सने जात होतो.रात्रीची वेळ होती आणि पाऊस संततधार पडत होता. बाहेर चिटपाखरूही रात्रीच्यावेळी फिरकत नव्हते.सगळीकडे काळोख आणि पावसाचे थैमान पावसाने घातले होते.अशा वातावरणात मला ट्रॅव्हल्समध्ये झोपही येत नव्हती.थोडावेळ मोबाईलमध्ये मेमरीकार्डमधील सेव्ह केलेली आॅडिओवरील गाणी ऐकत होतो.थोड्यावेळाने मला केव्हा डोळा लागला ते समजले नाही.
तीन-साडेतीन वाजता जाग आली तेव्हा ट्रॅव्हल्सच्या टाॅपवर पावसाचा टपटप पडण्याचा आवाज चालूच होता. तेवढ्यात बाजूला असलेली मोबाईलवर बोलत होती नि ती व्यक्ती पुण्याला महापूर आल्याची पुण्याहून दुसरी व्यक्ती बोलत होती.हा संवाद मी बराचवेळ ऐकत होतो.आता आपणही माझ्या मुलाला विचारुन चौकशी करावी पण मी तसे केले नाही.कारण सकाळी सकाळी मुलाची झोपमोड कशाला करायची असं म्हणून मी पावसामुळे गारठा झाल्याने अंगावर शाल घेतली आणि तसाच झोपी गेलो.
सकाळी सकाळी ट्रॅव्हल्स पुण्याजवळ असलेल्या वाघोलीपर्यंत आली तेंव्हा मला जाग आली आणि जागेवर उठून बसलो.तेव्हा खिडकीचा स्लाईड ग्लास बाजूला सरकवला आणि बाहेर पाहिलं.तर काय रस्त्यावरुन पावसाचे पाणी वाहत होते तर नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या.
वाघोलीपासून संगमवाडीला येण्यासाठी जवळ जवळ एक दीड तास लागणार होता.आता मी पूर्णपणे जागा होऊन माझ्या डोळ्याने बाहेरचं चित्र पाहू लागलो.
मनामध्ये नाना विचार येत होते.ज्यांना घरे आहेत ती निवांत झोपली असतील,झोपडीतली माणसं पाऊस पडत आहे आणि आता पाणी येत आहे म्हणून जागत बसली असतील तर फुटपाथवरची माणसं पावसानं कुडकुडत बसली असतील.काय पुण्यामध्ये पावसाने कसा कहर केला असेल याचा अंदाजही मांडणे कठीण असेल.मुळा मुठा नदी पात्र ओलांडून वाहत होत्या त्यामुळे तिथले जनजीवन विस्कळित झाले होते. पावसाळ्याचे हे विदारक चित्र पहायला मिळत होते.
काही मिनिटे गेल्यानंतर मी माझ्या मुलाला फोन करून संगमवाडीकडे गाडी घेऊन यायला सांगितले. माझी पत्नी पुणे मुक्कामी असल्यामुळे पहाटेच मुलांसोबत येण्याचा हट्ट मुलाला बोलवून दाखवल्यामुळे ते दोघेही गाडीमध्ये बसून संगमवाडीकडे निघाली आणि मी पोहोचण्यापूर्वीच ती दोघे संगमवाडीसमोर असलेल्या पुलावरील फुटपाथवर बाजूला गाडी उभी करुन मी येण्याची वाट पाहत होते.तेवढ्यात ट्रॅव्हल्स संगमवाडी थांबा आहे त्यासमोर येऊन उभी राहिली.आतील प्रवासी एक एक आपापले सामान घेऊन उतरत होते तर काही उतरण्याची घाई करत होते.दरवाज्याजवळ एकच गर्दी झाली होती.कुलीवाले,अॅटोवाले आणि भीक मागणारे भिकारी आणि गजरे विकणा-या तीन-चार मुली….हे दृश्य पाहून मी थोडा वेळ स्तब्ध झालो.खालून मुलाने आवाज दिला आणि म्हणाला,
“पप्पा सावकाश उतरा.गडबड करु नका सोबत आईपण आली आहे. मी खाली आहे सारेजण उतरली की,मी वर येईन तुमची बॅग घ्यायला”
असं म्हणत असतानाच एक मुलगी माझ्या पत्नीजवळ येऊन’ गजरा घ्या गजरा …’असं म्हणत तिला विनवणी करत होती.
त्या मुलीच्या हातात गजरा पाहून काही क्षण मला सुचलेच नाही.
माझ्या मुलाने बॅग घेतली आणि मला हळूच उतरण्यास सांगितले.मी खाली उतरलो आणि माझ्या पत्नीजवळ जाऊन उभा राहिलो तेव्हाही ती गजरा विकणारी मुलगी मला विणवणी करत म्हणाली,
“साहेब, तुम्ही तरी घ्या ना गजरा तुमच्या बाईसाहेबांना.. ! किती छान दिसतो बाईसाहेबांच्या केसांत माळल्यावर ! त्या काहीच म्हणत नाहीत.त्यांना आवडत नाही का ? तुम्ही कधी घेत नाही का किंवा तुम्हालाही आवडत नाही ?”
ती मुलगी करत असलेली विनवणी,तिचे नाजूक हात, गुलाबी ओठ,केस विस्कटलेले,अंगावरचा सदरा फाटलेला,पायात कसलेही पादत्राणे नाहीत.डोळ्यांत तिच्या पाणी तरळत होते,डाव्या हातात कोपरापर्यंत फुलांची गजरे आणि उजव्या हातात एक गजरा घेऊन गजरा घ्या गजरा घ्या असं म्हणत समोर उभी.
मी हे दृश्य पाहून माझ्या नजरेत ती चिमुरडी आर्जव करत असलेली पाहून मी माझ्या पत्नीला म्हटलं,
” सुनिता,ती किती वेळापासून तुला म्हणते आहे की, बाईसाहेब एकतरी गजरा घ्या म्हणून..!तू आपली गप्प उभी आहेस तिच्याकडे पाहत …”
” कशाला हो ? मला नाही आवडत.ती गज-याची फुलं सुकलेली आहेत म्हणून मी नको म्हणत आहे ” सुनिता म्हणाली.
” अगं फुलं तर सुकलेली आहेत त्यापेक्षा त्या मुलीकडे पहा,ती कितीतरी सुकून गेली आहे.तिला भूक लागली असावी म्हणून ती विनवणी करते आहे.बरं ते जाऊ दे. काही असो तिच्या जवळची जेवढी गजरे आहेत तेवढी घेऊन त्यांचे पैसे देऊन टाक .” असं म्हणून त्या गजरे विकणा-या मुलीला म्हटलं,
” बेटा,सगळेच्या सगळे गजरे तू मला दे आणि त्याची जेवढी किंमत झाली आहे तेवढी किंमत मी देईन.”
असं म्हणताच त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले.डोळे पुसत पुसत म्हणाली,
” साहेब, तुम्ही माझे सारे गजरे घेणार.मला खूप बरं वाटेल.याच पैशातून माझ्या आई-बाबांना काहीतरी खायला घेऊन जाईन.माझे बाबा काही दिवसांपासून काहीच खाल्ले नाहीत आणि आई तर अन्न अन्न म्हणूत तिष्ठत आहे केव्हाची.आज त्यांना खायला घेऊन जाईन.बरं झालं साहेब तुमच्यामुळेतरी माझे आई-बाबा पोटभर खातील.पण -“असं म्हणून ती एकाएकी शांत उभी राहिली.तिला काय बोलावे काही सुचत नव्हते.
ती सांगत असतांनाच माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.मी तिला जवळ घेतलं आणि तिच्या नाजुक गालावर ओघळत असलेल्या अश्रूंना पुसत म्हटलं,
” बाळा,तुझं नाव काय आणि तू कुठे राहतेस ?”
” माझं नाव गजरा आहे पण मला सगळेजण गजरीच म्हणतात कारण मी गजरे विकते म्हणून..!”गजरीने एका दमात सांगून टाकले.
ती बोलत असताना सुनिताच्याही डोळ्यांत अश्रू तरळू लागले आणि ती मला म्हणाली,
“अहो,आपण तिला अजून काही पैसे देऊ म्हणजे तिला बरे वाटेल.गरीब बिचारी पोर.एवढ्या लहान वयात किती जीवाला त्रास.”असं म्हणून सुनिताने हातात पर्स असलेल्या पर्समध्ये हात घालून पाचशे रुपयाची नोट काढली आणि त्या गजरीच्या हातात देत असतांनाच मी तिला द्यायला नकार दिला आणि म्हणालो,
” थांब सुनिता,मला तिच्याशी थोडं बोलायचं.मग नंतर तिला जेवढे ती म्हणेल तेवढे पैसे देऊ.”
” गजरी,तुझे आई-बाबा कुठे असतात ?”
“नदीकाठच्या फुटपाथवर ….आणि आता ते नसतीलही तिथे .कारण पूर आला ना ! आता त्यांना शोधावं लागतं… कुठे असतील तिथे जाऊन भेटावं लागेल.”
” गजरी,तू हे खरं बोलतेस ना ?”मी म्हटलं
” होय.मी कशाला खोटं बोलू साहेब.परिस्थितीनं मला खरंच बोलायला शिकवलं आहे.तसं तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्याबरोबर चला.मी पुढे जाते तुम्ही तुमच्या गाडीत बसून माझ्या मागे या.” गजरीने असं म्हणताच मला पूर्ण खात्री झाली की,गजरी खोटं बोलू शकत नाही.मी माझ्या मुलाला व पत्नीला म्हटलं,
” आपण गजरीला सोबत घेऊन तिच्या आई-बाबांना भेटू या आणि परिस्थिती काय आहे ते पाहू .”
असं म्हणून गजरीला आमच्या गाडीत घेत असताना ती म्हणाली,
” साहेब,किती बरं वाटतं?”
” छान वाटते ना ? मग आता तू आमच्या सोबत चल तुझ्या आई-बाबांना भेटायला…..” मला त्या गजरीकडे पाहून खूप दया आली.
तिच्या डोळ्यांत एक वेगळाच भाव होता.एकीकडे दारिद्र्याचे चटके, आई-बाबांना भेटण्याची आस आणि दुसरीकडे गाडीत बसल्याचा क्षणिक आनंद…!
ती सारखी एकीकडे गाडीतून बाहेरचे चित्र पाहत होती तर दुसरीकडे आमच्या तिघांवर नजर टाकून पाहत.तिला कदाचित स्वर्गानंद झाल्याचा भास होत असावा.
वीस-पंचवीस मिनिटानंतर गजरीने बाहेर हात काढून बोट दाखवून म्हणाली,
” साहेब,माझे आई-बाबा इकडेच राहतात “
” इकडे कुठे ?”मी प्रश्न करत करत मुलाला गाडी एका बाजूला थांबवायला सांगितली.आम्ही तिघेही गाडीतून बाहेर उतरलो आणि गजरीला उतरायला सांगितले.
गजरीने गजरे विकून मिळवलेले पैसे तसेच हातात ठेवलेले होते.
तिचा कोमल हात धरुन माझ्या पत्नीने विचारलं,
” गजरी,तुझे बाबा -आई कुठे असतात गं ?”
” ते पहा ना…त्या कडेला फुटक्या पत्र्याची पावसाने विस्कटलेली झोपडी दिसते ना तेच माझं आणि आमचं सारं विश्व.चला ना दूरुन थोडंच दिसणार ? माझे आई-बाबा असतील माझी वाट बघत…मला वेळ थोडा जरी झाला तरी बाबा आईला रागावून विचारत कुठं गेली गजरी आणि अजून कशी नाही आली ?माझी आईचे डोळे माझ्या वाटेकडेच लागून राहायचे…पण आज माझी आई बाहेर दिसत नाही साहेब !
काय झालं माझ्या आईला ?”
गजरी असं बोलत असतानाच दूरुन कुठल्यातरी झोपडीतून कुणीतरी रडल्याचा आवाज माझ्या कानावर येत होता.मी माझ्या मुलाला विचारले,
” अरे भैय्या,तुला काही कुणी रडल्याचा आवाज येतो का ?”
“हो.पण-“
” चला तर मग आपण पाहू जवळ जाऊन…” असं म्हणून आम्ही गजरीला घेऊन त्या झोपडीकडे गेलो आणि आतून जोरजोरात टाहो फोडून रडल्याचा आवाज येऊ लागला.
” आता आपली गजरी तुम्हाला खायला घेऊन येईल हो… तुम्ही आता उठून बसा की हो….ते आपलं पिल्लू आपल्यासाठी काहीतरी आणून देईल हो….गजरी बाळा येना …तुझे बाबा का काही बोलत नाहीत गं ?”असं म्हणून गजरीची आई रडू लागली.तेवढ्यात आम्ही गजरीला घेऊन पोहोचलो.गजरीने सुनिताचा हात सोडला आणि आईजवळ जाऊन म्हणाली,
” आई…आई….बघ ना आज मी किती पैसे आणले आणि बाबालाही खायला पाव आणला बघ ना आई ..बाबा बघा ना किती पैसे मी आणले.तुम्हाला पाव आणला आणि पैसेही आणले.आज आपण पोटभर जेवायला करु.माझे सारे गजरे विकले आहेत.बाबा बघा ना….आई बाबा का बोलत नाहीत ?माझ्यावर रागावले का ?मला उशीर झाला म्हणून ?”
” बाळा,तुझे बाबा आपल्याला सोडून गेले काहीच न खाता …भूक लागली होती ना ते देवाकडे गेले आहेत काहीतरी पोटाला मागून आणायला ….” असं म्हणून गजरीच्या आईने गजरीला पोटाशी धरुन जोर जोरात रडू लागली.
गजरी एकसारखी बाबाकडे पाहून रडू लागली.आमच्या तिघांचेही डोळे पाणावले होते.
गजरीची आई आमच्याकडे पाहून म्हणाली,
” साहेब,आपण कसे काय आलात हो ? माझ्या गजरीनंच तुम्हाला आणलं असणार ?तिनंच हट्ट केला असणार मला बाबाला भेटायचं म्हणून…साहेब माझी पोर रात्रीपासून मुसळधार पावसात कुठं होती आम्हाला काहीच माहित नव्हते.इकडे आमच्या झोपडीत पूराचे पाणी शिरले…आधीच भूकमारी आणि ह्या पावसानं,या पूरानं आमचं सगळंच हिसकावून नेलं …….आता आम्ही कसं जगायचं आणि कुणाच्या आधारावर ….? जो आधार होता तोही त्यानं नेला ….पण साहेब माझी गजरी लई गुणांची हाय हो…तिच्या गज-यावरच आमचं घर होतं….पण आज तिचे बाबा अन्नावाचून तिष्ठून गेले हो….गजरी तुझे बाबा आता तुला कधीच खायला पाव मागणार नाहीत गं ….!” असं म्हणून गजरीची आई रडू लागली.
गजरीच्या कुटुंबावर फार मोठा आघात झाला होता…गजरीच्या आईला खूप सांभाळण्याचा प्रयत्न केला.तीचे रडणे काही थांबत नव्हते तिच्या आईचे रडणे पाहून गजरीही रडू लागली.
आम्ही बराच वेळ तिथे थांबलो.जवळ असलेल्या शेजारच्या माणसांची भेट घेतली आणि गजरीच्या बाबांच्या अंत्यविधीसाठी व्यवस्था करायला लावली.गजरीला व गजरीच्या आईला थोडं बाहेर बोलावून तिच्या हातात मदतीचा एक हात पुढे करुन काही रुपये हातात दिले.जाताना गजरी आम्हाला म्हणाली,
” साहेब,माझ्या बाबाला भेटायला पुन्हा याल ना ? तुम्ही एवढे पैसे दिले म्हणून माझे बाबा मला बोलत नाहीत…” असं म्हणून गजरीने माझा हात धरला.तिने माझा हात धरल्यावर माझे अंत:करण अधिक जड झाले.तिच्या चेह-यावरुन हात फिरवत फिरवत आम्ही तिथून जड पावलांनी निघून गेलो.
का कोण जाणे त्या गजरीने माझ्या अंत:करणात एक घर केले होते.
काही दिवसांनी मी परत गजरीकडे जावे असे ठरले आणि त्याठिकाणी जाऊन पाहिले तर काय ..? तिथं त्याठिकाणी गजरीची कोणतीही निशाणी नव्हती.तिची आई नव्हती की ती गजरी नव्हती.कुठेतरी जीवनाच्या खडतर प्रवासाला निघून गेली असतील.मी मात्र त्या जागेकडे पाहून गजरीचे बोलके आणि हसरे रुप, अंगावर फाटके वस्त्र,निरागस चेहरा,हातात गजरे…हे तिचे चित्र माझ्या कित्येक दिवस डोळ्यात तरळत राहिले.
प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज मो.नं. :-
9226144836
(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)



