महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले!

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५) पत्रकार परिषदेत २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या निवडणुकांमधून ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे.

टप्पा तारीख
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५
मतदान दिवस २ डिसेंबर २०२५
मतमोजणी ३ डिसेंबर २०२५

एकूण नगरपरिषदा: २४६ (यात १० नवनिर्मित आणि २३६ मुदत संपलेल्या नगरपरिषदांचा समावेश)

एकूण नगरपंचायती: ४२ (यात १५ नवनिर्मित आणि २७ मुदत संपलेल्या नगरपंचायतींचा समावेश)

निवड होणार: ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष
मतदार संख्या: १ कोटी ७ लाख
मतदान केंद्रे: १३,३५५
उमेदवारी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे –
अर्ज पद्धत: उमेदवारी अर्ज पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. यासाठी आयोगाने पोर्टल तयार केले आहे.

प्रक्रिया: संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करणे बंधनकारक असेल.

जागा: एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक ४ उमेदवारी अर्ज भरता येतील.

जात वैधता: प्रत्येक उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, त्यांना त्याची पावती सादर करून अर्ज भरता येईल.

ईव्हीएमचा वापर: ही निवडणूक ईव्हीएमवरच होणार आहे.

मतदार याद्या: मतदारनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जातील. मतदार यादी तपासण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवर ‘सर्च फॅसिलिटी’ उपलब्ध असेल.

दुबार मतदारांवर नजर: ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदार ओळखण्यासाठी विशेष स्टार व्यवस्था असेल. एकदा मतदान केल्यास स्टार दिसेल, अधिक स्टार दिसल्यास दुसऱ्या मतदान केंद्रावर मत देता येणार नाही.

विशेष व्यवस्था: मतदान केंद्रावर दिव्यांग, गरोदर, तान्ह्या बाळांना घेऊन येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठांसाठी तसेच वीज, पाणी, सावली आणि शौचलयाची पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे.

गुलाबी मतदान केंद्रे: काही मतदान केंद्रे गुलाबी असतील, जिथे सर्व स्टाफ महिलाच असेल.

मोबाईल बंदी: इमारतींमध्ये मोबाईल नेता येईल, पण मतदानाच्या ठिकाणी मोबाईल नेता येणार नाही.

निवडणुकीचा प्रकार –
नगरपरिषद: निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीनुसार होईल. एका प्रभागात साधारणपणे २ जागा (विषम संख्या असल्यास ३ जागा) असतील. मतदारांना २-३ सदस्यांसाठी मतदान करावे लागेल.

नगरपंचायत: १ सदस्य व १ अध्यक्ष असतो, त्यामुळे मतदारांना दोन मते द्यावी लागतील.

या घोषणेमुळे आता राज्यात आचारसंहिता लागू झाली असून, पुढील महिन्यात होणाऱ्या या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button