महाराष्ट्र

गिरीश महाजनांनी अण्णा हजारेंचं आंदोलन गुंडाळलं, पण मनोज जरांगे गुंडाळण्यासारखी व्यक्ती नव्हे: संजय राऊत

प्रतिनिधी… रियाज मुलाणी मो 9921500780

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांचं हे उपोषण राज्य सरकारला गुंडाळता येणे शक्य नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी प्राण पणाला लावला आहे. कधीकाळी अण्णा हजारे यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उपोषण केले होते. तेव्हादेखील गिरीश महाजन मध्यस्थी करायला गेले होते. अण्णा हजारेंच्या या आंदोलनातून काहीच साध्य झाले नाही. आजही भ्रष्टाचार सुरु आहे. फक्त गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांना गुंडाळले होते. पण मनोज जरांगे-पाटील हे गुंडाळलं जाणारं व्यक्तिमत्त्व नाही. तो एक फकीर माणूस आहे. एका साध्या माणसाने महाराष्ट्र सरकारला जेरीस आणले आहे. मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारने गंडवागंडवी करु नये. समाजाला सत्य सांगावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विरोधात शालिनी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवारांनी हा कारखाना कवडीमोल भावात विकत घेतला, असा त्यांचा आरोप आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, हा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला असला तरी त्या आरोपाची चौकशी ईडीकडून सुरु होती. ईडीने तो कारखाना जप्त केला होता. याप्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले होते. पण अजित पवार यांच्या टोळीने भाजपमध्ये प्रवेश करताच ही सर्व प्रकरणं गुंडाळून ठेवण्यात आली. त्यामुळे शालिनीताई पाटील यांच्या लढाईला आमचा पाठिंबा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button