महाराष्ट्र

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातून पालघरसाठी 283 कोटींचा निधी मंजूर…. बहुजन विकास आघाडीच्या प्रयत्नांना यश.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.

मुसळधार पाऊस, वादळ, भूस्खलन अशा अनेक नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कमी व्हावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाचे काम जोरात सुरू झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात याबाबतची बैठक मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी पार पडली. या बैठकीतील विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील विविध कामांसाठी तब्बल 283 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .यासाठी बहुजन विकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी निकराचे प्रयत्न केले होते. या निधीतून भूमीगत विद्युतवाहिनी, आपत्ती निवारा केंद्रांची उभारणी आणि धुप प्रतिबंधक आणि खार प्रतिबंधक बंधारे उभारण्याचे काम होणार आहे.

या बैठकीसाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आपत्ती व्यवस्थापन संचालक आप्पासाहेब धुळाज, रस्ते विकास विभागाचे सचिव साळुंखे, माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, रमेश कोटी आदी मान्यवर उपस्थित होते.

पाऊसकाळात कोकण किनारपट्टीवर प्रचंड जोरात वारे वाहतात. या वाऱ्यांमुळे अनेक झाडं जमीनदोस्त होतात. या झाडांसह अनेकदा वीजेच्या तारा पडण्याच्या घटना घडून वीज खंडित होते. त्याशिवाय पूर किंवा दरड कोसळल्याने तात्पुरत्या निवाऱ्याची गरज भेडसावते. या सर्वच आपत्तींचा आगाऊ विचार करून त्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाची आखणी केली गेली. या प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यात उच्च दाबाच्या 307 किलोमीटर आणि लघुदाबाच्या 766 किलोमीटर लांबीच्या भूमिगत विद्युत वाहिनी टाकल्या जाणार आहेत. याशिवाय पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी आणि वसई या चार तालुक्यांमध्ये एकूण 8 बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारली जाणार आहेत.

या सर्व कामांसाठी बहुजन विकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे वेळोवेळी निवेदन सादर केले होते. तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातून ही कामे केली जावीत यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह पत्रव्यवहारही केला होता. या प्रयत्नांना अखेर यश आले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 8 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.

या प्रकल्पांसाठी तब्बल 283 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . या 283 कोटींपैकी 200 कोटी रुपये भूमिगत विद्युत वाहिनींचे जाळं तयार करण्यासाठी वापरले जाणार असून निवारा केंद्रांसाठी 13 कोटी रुपये खर्च केले जातील. उर्वरीत 70 कोटी रुपयांमधून जिल्ह्यातील 11 ठिकाणी धूप प्रतिबंधक आणि 19 ठिकाणी खार प्रतिबंधक बंधारे बांधले जाणार आहेत.
पालघर जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान झाडं पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पश्चिम किनारपट्टीवर सातत्याने चक्रीवादळं येत होती. या चक्रीवादळांमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झालं. अनेकांना आपल्या घरांना मुकावं लागलं. अशा लोकांसाठी तात्पुरता निवाराही उपलब्ध करावा लागतो. या कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button