शहर

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अल्पवयीन गर्भावती विवाहितेचा मृत्यू– दोषींवर गुन्हा दाखल

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी विवाहितेचा गरोदरपणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली आहे.बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करत 16 वर्षीय मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी पोलिसांनी तिचे आई-वडील, सासू-सासरे, लग्न लावणारा भटजी, आचारी, मंडप डेकोरेटर अशा आणखी 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला आहे.

मोखाडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या कातकरी समाजातील तरुणीचे जव्हार तालुक्यातील नेहाळे येथील 21 वर्षीय तरुणाचे दोन वर्षांपासून मुलीशी प्रेमसंबंध होते. यादरम्यान ती गरोदर राहिली होती. तिच्या कुटुंबीयांनी गेल्या 29 मार्च रोजी तिचे लग्न जयेश सोबत लावले होते.

लग्नाअगोदर गरोदर असलेल्या या अल्पवयीन मुलीचा 6 जून रोजी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. यावेळी ती साधारण पाच ते सहा महिन्याची गरोदर होती. सुरुवातीला तिच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतु पोलिसांच्या तपासानंतर, 22 जून रोजी अल्पवयीन मुलीच्या विवाह सोहळ्यात सहभागी असलेल्या पती आणि इतर 10 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

यामध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांचे पालक, मुलीचा मेहुणा, डेकोरेटर, केटरर, पुजारी आणि लग्नाच्या सोहळ्याशी संबंधित असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) एन (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे) आणि 34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 च्या कलम 9, 10 आणि 11 नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत मृत अल्पवयीन विवाहितेच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी श्री. प्रदीप गीते यांनी दिली आहे.

तसेच मोखाडा तालुक्यात शिक्षणाचा फारसा प्रचार प्रसार झालेला नाही. आजही येथे एखादी शाळकरी विद्यार्थांनी शिक्षणात हुशार असली, पुढे जाऊन तिची एखादी अधिकारी बनण्याची इच्छा असली तरी तिचे तिथे शिक्षण अर्धवट थांबवून आई-वडील लहान वयात लग्न लावून देतात. या घडणाऱ्या घटना थांबायला हव्यात. लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हायला हवी. कायद्याची जरब बसावी यामुळे या घटनेत जे जे दोषी आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कारवाई केली जाणार आहे, असे मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी श्री. प्रदीप गीते यांनी सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.पंकज शिरसाट या विभागाचे डी.वाय एस.पी. श्री.गणपत पिंगळे यांनी मार्गदर्शन केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सदरचा गुन्हा तपास चालू आहे.

मा.पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद योजना दोन वर्षापासून सुरू केल्यानंतर काही प्रमाणात बालविवाह ना आळा बसलेला आहे, परंतु अजूनही नागरिक असे प्रकार करतात त्यामुळे ही प्रथा बंद होणं गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button