इंदापूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतातील उसाच्या लागवडीसह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल 8378076123
इंदापूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतातील उसाच्या लागवडीसह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतातील इतर कामे ठप्प झाले असल्याने गावोगावच्या मजूरांच्या हाताला कामे नसल्याने बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर तरकारी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने तरकारी महागली आहे. तसेच चारा पिकांची उपलब्धता कमी झाल्याने दुग्धव्यवसाय अडचणी सापडला आहे. तर औषधे, बि-बियाणांच्या दुकानात माल भरून शेतकऱ्यांची वाट पाहण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.
पावसाळ्याला सुरूवात होऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटला असून बावडा, नरसिंहपूर परीसरात म्हणावा तसा एकही पाऊस पडला नाही. उजनी धरण क्षेत्रात व परीसरात समाधानकारक पाऊस झाला नसून धरणातील पाणी साठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जर पावसाच्या उर्वरीत कालावधीत धरणात पाणीच आले नाही, तर मात्र दुष्काळ पडण्याची भिंती निर्माण झाली आहे. तसेच सध्याला धरणाच्या उपलब्ध पाण्यावर भिमा नदीवरील माढा व इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाणी योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.
नीरा नदीचे पात्र तर मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून कोरडे पडल्याने यावर असणारे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेती ओसाड पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. शेतातील उभी पिके कडक उन्हाळ्यात अर्धी निमी जळून गेली आहेत. तर बाकी उरली सुरली पिके पावसाच्या पाण्यावर तरतील या आशेवर शेतकरी राजा असताना मात्र पावसाने दांडी मारल्याने पिके हातची जाऊन आर्थिक नुकसान होणार या विवंचनेत शेतकरी राजा आहे.

पावसाने ओढ दिल्याने दाळी, मटन, चिकन, भाजीपाला महागला आहे. तर शेतातील कामे ठप्प झाल्याने शेतमजूरांच्या हाताला कामे नसल्याने मोठी आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे बाजारपेठेत माल आहे परंतू खरेदीसाठी पैसा नसल्याने कोणी फिरकायला तयार नसल्याने बाजारपेठा ग्राहकांन अभावी ओस पडल्या आहेत.
शेतकऱ्यांनी पावसाच्या जिवावर ऊसाची लागवड करण्यासाठी शेत नांगरून, खांदून, ओढून, सऱ्या सोडून ठेवल्या आहेत. पाऊस पडल्याबरोबर ऊस बेणे आणून लागण दाबायची एवढेच काम शिल्लक ठेवले आहे. परंतू पावसाच्या प्रतीक्षेत शेती मोकळी ठेवण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे. जर का अशीच परिस्थिती राहीली तर मात्र दुष्काळ पडण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्याला पावसाने ओढ दिली असल्याने शेतकरी, शेतमजूर, दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन, व्यापारी, नागरीक, चिकन व मटन दुकानदार हातघाईवर आला आहे. बाजारपेठच थंड पडल्याने पैसा फिरायला तयार नाही. त्यातच नीरा नदी कोरडी तर भिमा नदीत पंधरा दिवस टिकेल एवढेच पाणी शिल्लक आहे.



