सोशल मिडियाच्या मोहजालात न अडकता संस्काराची शिदोरी घेऊन नवनवीन आव्हानांना सामोरे जावे- स. पो. निरीक्षण मनीषा महाडिक

प्रतिनिधी राहुल गायकवाड
(अकलूज) येथील सदाशिवराव माने विद्यालयात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीताई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. विद्या एकतपुरे तर प्रमुख पाहुण्या म्हणून अकलूज पोलीस ठाण्याच्या स. पो. निरीक्षक मनीषा महाडिक ह्या उपस्थित होत्या.

यावेळी व्यासपीठावर अभिरूप महिला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सानिया मिर्जा उपस्थित होत्या. यावेळी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल फुले सर यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून यासारख्या अनेक भूमिका पार पाडणाऱ्या स्त्रीने आज समाजात प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने यशाची शिखरे पार पाडली आहेत.

चूल आणि मूल या चक्रव्युहात न अडकता शिक्षणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतेही क्षेत्र असो तिथे महिला काम करताना दिसतात. एवढेच नव्हे तर अंतराळ मोहिमेतही महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माळशिरस तालुक्याच्या भाग्यविधात्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला व प्रमुख पाहुण्या व अध्यक्षा यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व विभागातील महिला शिक्षिकांचा, अभिरूप भूमिका पार पाडलेल्या मुलींचा, गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार मानाचा फेटा घालून करण्यात आला. तसेच सायन्स ओलंम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदक व ५००० रु शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या सुफिया शेख, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रविण्या मिळविलेल्या सलोनी देवकाते व अखिल भारतीय नाट्य परिषदेत एकपात्री प्रयोग करणाऱ्या ज्ञानेश्वरी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संगीत शिक्षक सुहास पवार सर यांनी स्वरचित ‘उंच भरारी घे तू नारी….’ हे महिला गौरव गीत सादर केले.विद्यार्थी भाषणामध्ये आदित्य माने, भाग्यश्री मगर, साक्षी वाघमारे यांनी तर शिक्षक मनोगतात संदीप शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मनीषा महाडिक यांनी आधुनिक काळात “मुलींनी सोशल मीडियाच्या मोहजालात न अडकता संस्काराची शिदोरी घेऊन नवनवीन आव्हानांना सामोरे जावे. ” असा संदेश दिला तर समाजात वावरताना जर छेडछाड, विचित्र नजरेने पाहणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध दुर्लक्ष न करता निर्भया पथकाकडे आपली तक्रार दाखल करावी असा सल्ला दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्या एकतपुरे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन स्त्रियांचे आजार,आरोग्य, आहार, वर्तन, शारीरिक बदल याविषयी आपले विचार व्यक्त केले. मुलींनी आईला खंबीर बनविणे ही आपली जबाबदारी असून मिळालेल्या स्वातंत्र्य व स्वैराचारामध्ये चांगले संस्कार रुजविणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट पवार यांनी तर आभार निंबाळकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



