माळशिरस तालुक्यातील पालखी मार्गावरील नगरपरिषद, नगरपंचायत ,असलेल्या गावांना अनुदान देण्याची आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांची मागणी

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी पालखी मार्गावरील मुक्काम व विसाव्याच्या गावांना विशेष अनुदान सुरू केले होते . अगदी त्याचप्रमाणे पालखी मार्गांवरील नव्याने निर्माण झालेल्या अकलूज नगरपरिषद , महाळुंग -श्रीपुर , नातेपुते आणि माळशिरस या नगरपंचायतींना देखील अनुदान सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार रणजितसिंह यांनी सांगितली .
दोन्ही संतांच्या पालखी मार्गांवर मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी विसाव्याच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या वारकऱ्यांना विविध सेवा सुविधा पुरवाव्या लागतात .त्याशिवाय पालख्या निघून गेल्यानंतर या गावांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने निगा ठेवावी लागते .यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी ते स्वतः ग्राम विकास मंत्री असताना पालखी मार्गावरील मुक्कामाच्या गावासाठी १० लाख व ज्या ठिकाणी पालखीचा विसावा असतो त्या गावासाठी ५ लाखांचा निधी पालख्या येण्यापूर्वी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता तो आजतागायत अमलात आणला जात आहे .त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर असणाऱ्या नातेपुते व माळशिरस येथे नव्याने नगरपंचायती स्थापित झाल्या आहेत .
या ठिकाणी प्रत्येकी ४० लाख रुपये सेवा सुविधा अनुदान मिळण्याची मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे . त्याशिवाय संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर असणाऱ्या अकलूज येथे नव्याने नगरपरिषदेची निर्मिती झाली आहे .येथे संत तुकोबांची पालखी मुक्कामी असते . त्याशिवाय आदल्या दिवशी तुकोबांची पालखी लगतच्या सराटी गावात मुक्कामास असली तरी बहुतांशी वारकरी हे अकलूज येथेच विसावतात . त्यामुळे अकलूज साठी ७५ लाखांचे अनुदान मिळावे अशी आमदार रणजितसिंह यांची मागणी आहे .
संत तुकोबांच्या पालखी मार्गावरील महाळुंग -श्रीपुर येथे नव्याने नगरपंचायत स्थापित झाली आहे .येथे पालखीचा विसावा व परतीच्या प्रवासाचा मुक्काम देखील असतो या ठिकाणीही ४० लाखांचा निधी मिळावा असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे .उपमुख्यमंत्री यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले .



