महाराष्ट्र

महाराष्ट्रातील मराठा समाजाने गाफील राहू नये.—ॲड.शीतल चव्हाण.

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारणत: ३० ते ३५ टक्के लोकसंख्या असलेला मराठा समाज आज अनेक प्रकारच्या संघर्षाला सामोरा जात आहे. आरक्षणाचा हक्क मिळावा यासाठीची गेल्या अनेक वर्षांची मागणी राजकीय अनास्था आणि न्यायालयीन तांत्रिकतेच्या गुंत्यात अडकून पडलेली आहे.
महाराष्ट्राच्या मातीत वेळप्रसंगी हातात शस्त्रे घेवून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी लढणाऱ्या आणि शेती करुन समाजाला पोसणाऱ्या या समाजातील बहुतांश लोकांना आज सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, शेती-उद्योग-व्यवसायातील संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.

मराठा समाजात केवळ ४% लोक जमीनदार, गर्भश्रीमंत आणि राजकीय सत्तेचा दिर्घकालीन उपभोग घेतलेले, घेत असलेले आहेत. या समाजातील उर्वरीत लोक अल्पभूधारक, भूमीहीन झाले आहेत. मराठा समाजातील ४% गर्भश्रीमंत आणि सत्ता भोगणाऱ्या लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय हितसंबंध हे या समाजातील उर्वरित लोकांच्या हितसंबंधांपेक्षा संपूर्णत: भिन्नच नव्हे तर परस्पर विरोधी आहेत. पण ‘जात’ या ‘लेबल’खाली ४% वाल्यांनी समाजातील उर्वरित लोकांची नेहमीच फसवणूक केलेली आहे. आजही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रमुख सत्तास्थानी व नेतृत्वस्थानी हा ४% श्रीमंत मराठा समाज बसलेला आहे.

समाजातील राजकारणात सक्रिय असलेल्या उर्वरित सर्वसामान्य लोकांना ४% वाल्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, दिवाळखोरीत निघालेल्या सहकारी संस्थांच्या तुकड्यांवर समाधान मानायला भाग पाडले आहे. काहींच्या कित्येक पिढ्या केवळ सतरंज्या उचलण्यात बरबाद झाल्या आहेत. वास्तविक पाहता छत्रपती शिवरांच्या स्वराज्याला विरोध करायला आणि शिवरायांना राजे म्हणून नाकारायला तत्कालिन प्रस्थापित, गर्भश्रीमंत मराठा समाज पुढे होता. शिवरायांच्या स्वराज्याला आपले मानून त्यासाठी तळहातावर शीर घेवून लढणारा श्रमिक, कुणबी मराठा समाज होता.

पण शिवरायांचे नाव घेवून व जातीचे ‘कार्ड’ वापरुन आधुनिक काळात ४% धनिक मराठा समाज उर्वरित कष्टकरी मराठा समाजाचा सोयीस्कर वापर करुन घेत आला आहे. आज गावोगावी मराठा समाजातील बेकार तरुणांच्या फौजा तयार झाल्या आहेत. शेती जाणीवपूर्वक आतबट्याची केली गेली आहे. मुळात शेतीचे तुकडे पडून क्षेत्र कमी झाले आहे. आहे ती शेती फायद्याची राहिली नाही. नोकऱ्या नाहीत. उद्योगधंदे करायला भांडवल नाही. मग या गर्भगळीत झालेल्या तरुणांचे टोळके बनवून श्रीमंत मराठा समाज त्यांचा आपल्या राजकीय सोयीसाठी वापर करीत आहे.

तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेले मराठा समाजातील नेत्यांची पोरं युवानेते, साखरसम्राट, शिक्षणसम्राट, उद्योजक, बडे गुत्तेदार होवून मिरवत आहे आणि सर्वसामान्य मराठा कुटुंबातील तरुणांवर आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची आणि ते ही नाही जमल्यास नव्याने पैदास झालेल्या युवानेत्यांची हुजरेगीरी करण्याची नामुष्की आलेली आहे. पस्तीशी ओलांडून गेली तरी आर्थिक स्थैर्य नसल्याने लग्न न झालेल्या मराठा तरुणांची प्रचंड मोठी संख्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आढळत आहे. नैराश्यातून लाचारी, व्यसनाधीनता आणि पुढे आत्महत्या या दुष्टचक्रात अडकून अनेक कुटुंबांची राखरांगोळी होत आहे.

गर्भश्रीमंत मराठे मात्र सत्तेच्या गाद्या उबवण्यात, गुत्तेदाऱ्या-टक्केवारी-हफ्तेबाजी करुन माया कमावण्यात आणि स्वत:च्या जन्मदिवसांचे ‘इव्हेंट्स’ साजरे करण्यात मश्गुल आहेत. या पुढाऱ्यांना समाजातील गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या अस्तित्वाची अगर अस्मितेची कसलीही फिकीर नाही.येणारा काळ हा सर्वसामान्य मराठ्यांसाठी बिकट असणार आहे. या अंधकारमय परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला छत्रपती शिवरायांच्या व शंभूराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेत बुद्ध-बसवण्णा-जिजाउ-सावित्री-रमाई-फातिमा-फुले-शाहू-आंबेकरांच्या विवेकवादी विचारांची कास धरावी लागणार आहे. बड्या मराठा राजकीय पुढाऱ्यांच्या गुलामीला झुगारुन स्वाभिमानाची मशाल पेटवावी लागणार आहे.

‘सर्वांस पोटास धरणे आहे’ हा मुलमंत्र शिवरायांनी आम्हाला दिलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या तमाम पिडित, शोषित बांधवांना पोटांस धरावयाचे आहे. प्रस्थापितांच्या दयेला, भीकेला, कृपेला झुगारुन द्यायचे आहे. बाबासाहेबांनी ‘शिका, संघर्ष करा आणि संघटीत व्हा’ हा मुलमंत्र तमाम बहुजनांना दिलेला आहे. त्यास प्रमाण मानून आम्हाला शिकायचे आहे, मेहनत करायची आहे, संघर्ष करायचा आहे. शिकून, संघर्षातून, मेहनतीतून मिळवलेल्या धनाचा उपयोग आपल्या समाजातील सर्वसामान्यांना राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी करायचा आहे.

मराठा ही फक्त जात नसून ती वृत्ती आहे. गुलामी, तोंडचाटकेपणा, लाचारी नाकारणे; स्वाभिमानाने, ताठ मानेने आणि स्वकर्तृत्वावर जगणे हीच ती वृत्ती आहे. मराठ्यांतील तमाम सर्वसामान्यांनी आपल्यातील ही वृत्ती जागवायची आहे. गाफीलपणा सोडून द्यायचा आहे. आम्ही आज गाफील राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आम्हाला कदापी माफ करणार नाहीत हे ध्यानी घ्यायचे आहे.

ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button