खावडा वीज प्रकल्पाच्या जमीन मोबदल्यासाठी बाधित शेतकऱ्यांची बैठक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
पालघर व ठाणे जिल्ह्यातून वीज प्रसारण करण्यासाठी टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. खावडा वीज कंपनीमार्फत हे काम सुरु आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यातील वाडा व भिवंडी तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून हा प्रकल्प जाणार आहे. जमिनीचा मोबदला दर ठरविण्यासाठी भिवंडी प्रांतानी बैठकीचे आयोजन केले आहे.
बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी ही बैठक घेण्यात येत आहे.स्थानिक आमदार शांताराम मोरे देखील मोबदल्याच्या चर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये पारदर्शक आणि सर्वसमावेशक निर्णयप्रक्रियेवर भर दिला जाणार आहे. अंबाडी, डिघाशी, डालोंडे, चाणे, खरिवली, जांभिवली तर्फे खांबाळे, किरवली, दूरवली, लाप बुद्रुक, खालिंग बुद्रुक, दळेपाडा, चिंचवली तर्फे राहूर, देवळी, भोकरी, डोहळे, पाडघा, आन्हे, बंद्रे आणि भडाणे या गावातील बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला शासनाच्या प्रचलित धोरणनुसार ठरविण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रक्रियेनुसार, जेव्हा वीज टॉवर शेतात उभारले जातात, तेव्हा त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो. हा दर संबंधित तालुक्याच्या प्रांत कार्यालयाकडून कडून ठरवला जातो. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात मोबदल्याचे दर आधीच निश्चित झाले आहेत. मात्र, वाडा आणि भिवंडी तालुक्यात अद्याप दर ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींना आणि शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. दर निश्चितीनंतर शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला तातडीने दिला जाणार आहे. तर पिकाची नुकसान भरपाईसुद्धा दिली जाणार आहे. ही नुकसानभरपाई पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार आणि ठाण्यामधील भिवंडी अशा तालुक्यांमध्ये दिली जात आहे.



