विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या पालघर जिल्ह्यातील जनता दरबाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद..आदिवासी बांधवांच्या प्रश्नांबाबत विधानपरिषदेत आवाज उठविणार-..विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640
पालघर जिल्ह्यात आयोजित जनता दरबाराला शुक्रवारी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांवर मोठया प्रमाणात अन्याय होत आहे.आदिवासी बांधवांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असलेल्या सरकारबाबत विधानपरिषद सभागृहात आवाज उठविणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जनता दरबारात २६९ अर्ज प्राप्त झाले. यात ११९ अर्जदारांना पाठपुराव्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पत्र देण्यात आले. तर ४३ प्रकरण ऑन द स्पॉट निकाली काढण्यात आले. तर उर्वरित प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे दानवे यांनी म्हटले.
जनता दरबारात बुलेट ट्रेन भूसंपादन करताना
एकाच गावात वेगवेगळे जमिनीला भाव देत असल्याची अनेक प्रकरण समोर आली. तसेच घरकुल योजना, विविध औद्योगिक वसाहतीतील प्रश्न, मच्छिमार बांधव,विविध प्रकल्पबाधित यांचे प्रश्न,समस्या शुक्रवारी पालघर येथे आयोजित जनता दरबारात आले.
या जनता दरबारात आयुष डुबे या एफवायबीएसीत शिकणारा विद्यार्थी गेले ३०दिवस स्कॉलर्शीपसाठी निवासी दाखल्याच प्रमाणपत्र मिळावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारत होता. आज स्कॉलर्शीपसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी त्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामुळे प्रमाणपत्र मिळालं.
आदिवासी बांधवांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवित असताना जनतेला शासनाच्या दारात जावं लागत ही शोकांतिका असल्याची खंत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.शासन आपल्या दारी कार्यक्रम होत असताना आम्ही जनाधिकार जनता दरबारातून काही प्रमाणात जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दानवे म्हणाले.तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायम वाढवण समितीसोबत असून समितीला पाठबळ देणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीची जास्त घाई झाली त्यामुळे अपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटनाचा सपाटा त्यांनी लावला असून त्यासाठी सतत महाराष्ट्रात यावं लागत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
यावेळी पालघर संपर्कप्रमुख व आमदार
सुनिल शिंदे, सहसंपर्कप्रमुख निलेश गंधे, विकास मोरे,पंकज देशमुख जिल्हाप्रमुख वसई,
राजू पाटील जिल्हाप्रमुख भोईसर , जनार्दन पाटील पालघर लोकसभा संघटक,ज्योती ठाकरे शिवसेना उपनेत्या,महिला आघाडी पालघर भरती कांबळी लोकसभा संघटक , नमिता राऊत सहसंपर्कप्रमुख, मनीषा पिंपळे पालघर विधानसभा तालुका संघटक उपस्थित होते.