निवडणुकीत लोक ऑपरेशन लोटस चा कार्यक्रम करतील— विश्वंभर चौधरी

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
भाजपाला कळून चुकलं आहे की डाव अंगावर उलटला. गद्दारांना घेऊन, सुरत ते गुवाहटी अमाप पैसा खर्च करून उद्धव ठाकरेंना तर सत्तेतून हटवलं पण शिंदे आणि कंपनीचं ओझं आता पेलवत नाही.
अंतर्गत सर्वे आला आणि त्यात भाजपाची महाराष्ट्रात दाणादाण उडणार असं सांगितलं गेलं अशीही चर्चा आहे. शिंदेसेनेचे पाचच्यावर एकही आमदार निवडून येणार नाही असंही सर्वे सांगतो म्हणतात.
अर्थात शिंदेसेनेचं पानिपत होणार हे सांगण्यासाठी कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. त्यांचे जे चेहरे टीव्हीवर येऊन बेताल बोलतात त्यावरून या पक्षाचा बौद्धिक वकूब लोकांच्या लक्षात येतो. त्यातून अगदी कालच्या जळगावच्या (म्हणजे तोंडाला येईल ते बोलणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघापर्यंत) उद्धव ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. शिंदे सेनेचे भाडोत्री प्रेक्षक सुद्धा पैसे नको पण भाषण आवर म्हणत अर्ध्यावर निघून जातात. दुसरीकडे मूळ शिवसेनेला उत्स्फूर्त प्रेक्षक मिळत आहे. शिंदे आणि कंपूनं उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती मिळवून तर दिलीच पण मूळ शिवसेनेचा कार्यकर्ता एवढा पेटलेला कधीच दिसला नव्हता गेल्या वीस वर्षात, तो आत्ता दिसत आहे.
महाराष्ट्रातला सामान्य माणूस यावेळी कोणाला निवडून आणण्यासाठी यावेळी बूथवर जाणार नाही तर भाजप- शिंदेसेनाला पाडण्यासाठी जाणार याचा अंदाज भाजपालाही नक्की आलेला आहे.
म्हणून नवं ऑपरेशन लोटस चाललंय महाराष्ट्रात. या ऑपरेशनचं संचालन दिल्लीतून आहे. या मागे महाराष्ट्रातलं सरकार टिकवणं ही धडपड नसून लोकसभेत महाराष्ट्रात या पक्षाचं आणि यांच्या शिंदेसेनेतल्या बगलबच्चांचं जे पानिपत होणार ते वाचवायचा प्रयत्न आहे. ते करायचं असेल तर मविआ फोडण्याशिवाय भाजपाला गत्यंतर नाही. म्हणून राष्ट्रवादीशी जवळीक चालू आहे.
राष्ट्रवादीला एक ऐतिहासिक संधी आहे. महाराष्ट्रातून भाजपाला हद्दपार करण्याची, त्याऐवजी ते स्वतःलाच भाजपकडे हद्दपार करून घेतात की काय ते पहायचं.
कोणी कुठंही गेलं तरी हरकत नाही, या वेळी भाजपविरोधात दगडधोंडेसुदधा निवडून येतील महाराष्ट्रात इतका लोकांचा संताप दिसत आहे. तो विधान परिषद निवडणुकीपासून दिसत आहेच. जेव्हा लोक या गलिच्छ, सत्तापिपासू, खोट्या आणि दडपशाही करणाऱ्या राजकारणा विरोधात स्वतःच लढाई हातात घेतात तेव्हा ‘कसबा’ घडत असतो. महाराष्ट्राचा ‘कसबा’ होणार हे नक्की आहे, अशावेळी लोक विरोधी पक्षाचा उमेदवार पहात नाहीत, फक्त ज्यांना हरवायचं ते त्यांच्या डोक्यात गेलेले असतात.
आत्ता कदाचित ऑपरेशन लोटस यशस्वी झालं तरी निवडणुकीत लोक ‘लोटस’ चा कार्यक्रम करणार असतील तर हे यशं अल्पावधीचं ठरणार आहे.



