सर्व सामान्य आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी माळशिरस सेतू कार्यालय पुन्हा सुरू करा – पत्रकार संघाची मागणी.

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
03/04/2023 : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माळशिरस सेतू कार्यालय बंद करण्यात आल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. मात्र सेतू कार्यालय बंद करू नये अशी ठाम मागणी माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ (रजि.) अकलूज यांनी केली आहे.अशी माहिती सर्व ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संस्थापक अध्यक्ष) आणि ज्येष्ठ पत्रकार नागनाथ बाबुराव साळुंखे यांनी अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता, प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया व सोशल प्रसार माध्यमांना सांगितली.
माळशिरस सेतू कार्यालय पुन्हा सुरू करावे या मागणीचे निवेदन सोबत देत आहोत दहावी बारावीची परीक्षा संपल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थी वेगवेगळे दाखले मिळण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी करतात. सेतू कार्यालय बंद केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. सेतू कार्यालयात जो दाखला शासन निर्णय नुसार मिळत होता त्यासाठी महा-ई-सेवा केंद्रामध्ये किमान 150 ते 200 रुपये मोजावे लागतील. याशिवाय महा-ई-सेवा केंद्रातून यापूर्वी चुकीची काम झालेले अनुभव आहेत. यामुळे भ्रष्टाचारासाठी वाव मिळणार आहे.
एका केस मध्ये महा ई सेवा केंद्रातून बोगस अफिडेविट करून एका वृद्ध महिलेच्या अकाउंट वरचे दोन कोटी रुपये काढून घेतले होते. या प्रकरणात उत्तर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती. राऊत गोळे यांना काही दिवस जेलमध्ये राहावे लागले. त्याचबरोबर जिल्ह्यातील 11 सेतू कार्यालय बंद झाल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बेरोजगारीमुळे त्यांनी जीवाचे बरे वाईट केल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनामध्ये दिलेला आहे.
याशिवाय महा-ई-सेवा केंद्रातून दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेक प्रश्न उद्भवू शकतात. एखाद्या विद्यार्थ्याला वेळेत दाखला न मिळाल्यास त्याचे ऍडमिशन रद्द होऊ शकते. या अशा घटनांमधून एखाद्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले तर त्याला देखील प्रशासन जबाबदार असणार आहे. आमची मागणी आहे की जिल्ह्यातील सेतू कार्यालयाचे टेंडर पुन्हा एकदा काढावे आणि सेतू कार्यालय पूर्ववत करावे. येत्या दोन महिन्यात विद्यार्थ्यांचे ऍडमिशन सुरू होतील.
राज्यात सेतू कार्यालये कोठे हि बंद करण्यात आली नसून सर्व जिल्हय़ात रि टेंडर काढण्यात आली आहेत.मग सोलापूर जिल्ह्यातील सेतू कार्यालयांची री टेंडर का निघाली नाहीत ? असा प्रश्न सर्वसामान्य जनता आणि विद्यार्थ्यांवर्गातून पुढे येत आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा आपण योग्य विचार करून आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावे ही अपेक्षा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्याला लाभलेल्या दोन विद्यमान आमदारांनी यामध्ये लक्ष घालावे. त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील ज्या गावाकरीता महा-ई सेवा केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे त्याच गावात जनहिताच्या दृष्टीने सदर महा-ई-सेवा केंद्र चालविले जावे असेही निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.
याचा प्रशासनाने विचार न केल्यास आठ दिवसानंतर धवलक्रांती शिधापत्रिका सेवाभावी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नागनाथ बाबुराव साळुंखे हे प्रांत कार्यालय अकलूज येथे आमरण उपोषणास बसणार आहेत अशी माहिती धवल क्रांती शिधापत्रिका संघाचे सचिव ज्येष्ठ पत्रकार किशोर राजाराम इनामदार यांनी सांगितली.तसेच विद्यार्थ्यांना घेऊन प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.



