भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करणारे ‘मविआ’चे नेते देशातील सांस्कृतिक, सामाजिक संघर्ष समजून घेतील काय?-ॲड. शीतल चव्हाण

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
दि.०२ एप्रिल, २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी(मविआ)च्या नेत्यांची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. भाजपच्या वाढत्या एकाधिकारशाहीविरुद्ध एकत्र येवून लढण्यासाठी महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व इतर पक्ष-संघटनांनी ‘मविआ’ची मोट बांधली. भाजपच्या ‘फॅसिस्ट’ राजकारणाला पर्याय म्हणून समोर आलेल्या या ‘मविआ’चे तमाम संविधानवादी लोकांनी स्वागत केले.
सद्य परिस्थितीतला राजकीय पर्याय म्हणून ‘मविआ’चा स्विकार केला जात असताना देशातील सांस्कृतिक व सामाजिक संघर्षाचे राजकारण पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी असमर्थ आहे, हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. सोबतच ‘मविआ’ला राजकीय पर्याय म्हणून स्विकारण्याची अपरिहार्यता असलेल्या चळवळींनी ‘मविआ’च्या सत्तेच्या राजकारणात विरघळून न जाता आपले सांस्कृतिक व सामाजिक संघर्षाचे राजकारण नेटाने व अधिक जोमाने पुढे नेले पाहिजे, हे देखील समजून घेणे आवश्यक आहे.
कारण, भारतातील श्रमिक, शोषित बहुसंख्य वर्गाचे राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व आर्थिक अशा सर्व प्रकारचे हितसंबंध इथल्या सांस्कृतिक व सामाजिक संघर्षाच्या राजकारणात दडलेले आहेत. मूठभर अभिजन, उच्चवर्णीय समाजाने निर्माण केलेली सांस्कृतिक प्रतिके ही आमची नाहीत, त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिकांतून व प्रथा, परंपरांतून आमच्या अस्तित्वाच्या खानाखूना गाडल्या जात आहेत, हे समजून घेतल्याशिवाय निव्वळ राजकीय सत्तेला पर्याय उभे करुन प्रश्न सुटणार नाहीत.
‘मविआ’ आयोजित ‘वज्रमूठ’ सभेच्या मंचावरुन ‘मविआ’च्या नेत्यांची भाषणे झाली. भाषणांच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचे मंचावर आगमन होताच प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महामानवांच्या प्रतिमेलगत ठेवलेल्या भल्यामोठ्या भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. भारतमाता ही ‘मविआ’चे दैवत आहे, असेही सुत्रसंचालकाकडून सांगण्यात आले.
‘भारतमातेची’ ही प्रतिमा कुणी बनवली? भारतमातेची ही प्रतिमा देशातील श्रमिक, कृषिक, बहुधार्मिक, बहुभाषिक, बहुसांस्कृतिक अस्तित्वांचे प्रकटन करणारी आहे का? की ही प्रतिमा एका ठराविक अभिजन वर्गाच्या, उच्चवर्णीयांच्या मेंदूतून, त्यांचे सांस्कृतिक वर्चस्व लादण्याच्या मानसिकतेतून निर्माण झालेली आहे? भारतमातेची ही प्रतिमा विविधतेने नटलेल्या या देशाचे बहुअंगाने दर्शन घडवणारी आहे की देशाची बहुविधता लपवून एका ठराविक संस्कृतीच्या वर्चस्वाचे प्रतिक ठरणारी आहे? या सगळ्याचा सविस्तर व खोलात जावून विचार झाला पाहिजे.
भारतमातेच्या प्रतिमेची संकल्पना कुणी मांडली?
भारतमातेची प्रतिमा प्राचीन आणि मध्ययुगीन काळात कुठेही आढळत नाही. साम्राज्यवादी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढताना भारतीय राष्ट्रवादाचा जन्म झाला. ह्या भारताला माता संबोधण्याची, या मातेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्याची व तिची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना आकार घेवू लागली. बंगालच्या अवनींंद्रनाथ टागोर (ठाकूर) व इतर काही बंगाली क्रांतीकारकांनी भारतमातेच्या प्रतिमेची संकल्पना सुरुवातीला मांडली. भारतमातेची पहिली प्रतिमा ही एका ‘वैष्णव सन्यासीनी’ची आहे. अरविंद घोष यांनी त्यांच्या ९९ श्लोकांच्या ‘भवानी-भारत’ या काव्यातही भारतमातेची संकल्पना मांडली आहे.
भारतमातेची प्रतिमा कशी आहे?
भारतमातेच्या प्रतिमेत एक गौरवर्णीय, हातात ‘ॐ’ लिहिलेला भगवा ध्वज घेतलेली, डोक्यावर मुकुट व रत्नजडित अलंकार परिधान केलेली, कपाळाला कुंकू लावलेली, आपल्या पाठिमागे उभ्या असलेल्या सिंहाच्या डोक्यावर हाताचा कोपरा ठेवून आशीर्वाद देणारी एक काल्पनिक देवता आहे.
टिकली लाव म्हणणाऱ्या भिडेंच्या वक्तव्याची मूळं भारतमातेच्या प्रतिमेत. भारतमातेची प्रतिमा स्विकारुन भिडेंवर टीका करता येणार नाही
“तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही,” असं वक्तव्य संभाजी ऊर्फ मनोहर भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी एका महिला पत्रकाराशी बोलताना केले होते. या वक्तव्यावरुन भिडे यांच्यावर बरीच टीकाही झालेली होती. परंतू, भिडे यांच्या वक्तव्याची मूळं भारतमातेच्या प्रतिमेत दडलेली आहेत, हे समजून घेतले पाहिजे. भिडेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी टीका केलेली होती. परंतू, एकीकडे भारतमातेच्या प्रतिमेचा स्विकार करायचा आणि दुसरीकडे भिडेंच्या वक्तव्याला विरोध करायचा.
एकीकडे पुरोगामीत्वाची, संविधानाची, बहुविध संस्कृती स्विकारण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे एका ठराविक संस्कृतीच्या प्रतिकाला भारतमाता म्हणून स्विकारायचे. एकीकडे भारतमातेला आपले दैवत म्हणून स्विकारायचे, तिचे पूजन करायचे आणि दुसरीकडे त्याच शेजारी बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही पूजन करायचे, हा शुद्ध ढोंगीपणा व दुटप्पीपणा आहे. मतपेट्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी केलेल्या या तडजोडी आहेत. म्हणून, सुप्रियाताई सुळे असोत की पुरोगामी म्हणवणारे इतर कुणी, भारतमातेची प्रतिमा स्विकारुन त्यांना भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करता येणार नाही.
भारतमातेच्या प्रतिमेत काय नाही?
आपल्या देशाला माता म्हणून संबोधण्यात काहीही गैर नाही. उलट देशाचा उल्लेख माता म्हणून करण्यात आपल्या सर्वांचा व देशाचाही गौरवच आहे. पण भारतमातेच्या रुपाने जी माता दाखवली जात आहे ती कशी आहे? तर हिंदू-वैदिक संस्कृतीचे प्रतिक असलेली ही माता आहे. आपल्या देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध, जैन, आदिवासी अशा अनेक धर्माचे व संस्कृतीचे लोक राहतात. हिंदू धर्मातच वैदिक संस्कृतीला नाकारुन अवैदिक प्रवाह निर्माण करणारे अनेक पंथ व सांप्रदाय आहेत. असे असताना एका ठराविक संस्कृतीचे वर्चस्व दाखवणाऱ्या भारतमातेची प्रतिमा कशाला?आपल्या देशात शेतात राबणाऱ्या, दगड फोडून रस्ते, बांधणाऱ्या, घाम गाळून व रक्त आटवून देशाच्या वैभवात भर घालणाऱ्या कृष्णवर्णीय महिलाही आहेत. या महिलांची संस्कृती ही कृषी संस्कृतीशी, श्रमसंस्कृतीशी नाळ सांगणारी आहे. या संस्कृतीचा साधा लवलेशही भारतमातेच्या प्रतिमेत नाही.
आपल्या देशातील कर्तृत्ववान महिला याच आमच्या भारतमाता
आपल्या देशात कर्तृत्ववान महिलांची कमतरता नाही. उलटपक्षी या देशाचा पायाच मूळी कर्तृत्ववान महिलांच्या योगदानावर उभा आहे. स्वराज्याच्या संकल्पनेचे स्वप्न पेरणाऱ्या मॉंसाहेब जिजाऊ, सती न जाता नेटाने राज्यकारभार सांभाळणाऱ्या अहिल्याबाई, इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या झलकारीबाई, शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणाऱ्या सावित्रीमाई, सावित्रीमाईंच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या फातिमाबी, बाबासाहेबांची सावली रमाई अशा अनेक कर्तृत्ववान महिला आमच्या देशात होवून गेल्या आहेत. असे असताना एका काल्पनिक, ठराविक सांस्कृतिक प्रतिकाचे प्रदर्शन करणाऱ्या भारतमातेचा स्विकार आम्ही का करावा? आमच्यासाठी जिजाऊ, अहिल्याबाई, झलकारीदेवी, सावित्रीमाई, फातिमाबी, रमाई याच आमच्या भारतमाता आहेत.
काल्पनिक भारतमाता स्विकारण्यास साफ नकार
शेतकरी, कष्टकरी, बहुविध संस्कृती असणाऱ्या देशातील तमाम सौभाग्यवती, विधवा, एकल, घटस्फोटीत, अविवाहीत महिला आमच्या आदर्श आहेत. आमचा अभिमान आहेत. त्याच आमच्या भारतमाता आहेत. टिकली लावलेल्या, न लावलेल्या, चंद्रकोर काढलेल्या, आडवा गंध लावलेल्या, उभा गंध लावलेल्या अशा सर्व महिला आमच्या भारतमाता आहेत. म्हणून अभिजन वर्गाने, सवर्ण वर्गाने त्यांची संस्कृती लादण्यासाठी निर्माण केलेल्या काल्पनिक भारतमातेला स्विकारण्यास आम्ही साफ नकार देतो.
सांस्कृतिक राजकारण समजून घेण्यास असफल ठरलेले ‘मविआ’चे नेते
आजघडीचे राजकारण हे फक्त सत्ता व संपत्तीकेंद्री आहे. या राजकारणाला सांस्कृतिक, सामाजिक संघर्षाच्या या देशातील गौरवशाली परंपरेशी काहीही देणेघेणे नाही. भारतमाता हे ‘मविआ’चे दैवत आहे, असे वज्रमूठ सभेतून सांगितले जात होते. हिंदू-वैदिक संस्कृतीचे वर्चस्व सांगणारी प्रतिमा ही ‘मविआ’चे दैवत असेल तर मग ते पुरोगामी कसे? संविधानवादी कसे? एकीकडे बाबासाहेबांचे, महात्मा फुल्यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे भारतमातेच्या काल्पनिक व सांस्कृतिक हुकुमशाहीला स्विकारायचे, हे कसले राजकारण? आपल्या मतपेट्या शाबीत ठेवण्यासाठी व हिंदू जनसमूदायाचे तुष्टिकरण करण्यासाठी ‘मविआ’ भाजपसोबत स्पर्धा करीत आहे, हे उघड दिसत आहे. भाजपची आणि ‘मविआ’ची सांस्कृतिक मूल्ये सारखीच असतील तर मग सत्तेत येवून ‘मविआ’ वेगळे काय करणार आहे?
सावरकरांचा मुद्दा असो, शिवरायांना भवानी माता तलवार देत असलेल्या काल्पनिक शिल्पाचा मुद्दा असो की भारतमातेच्या प्रतिमेचा मुद्दा असो, ‘मविआ’चे नेते भूमिका मांडत असताना ‘हिंदू दुखावतील की काय?’ या एकाच भीतीने पछाडलेले आहेत. असे भयग्रस्त झालेले नेते या देशातील बहुसंखय कष्टकरी वर्गाचे व या देशातील बहुविध संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्यास असमर्थ आहेत.
चळवळींनी विरघळून न जाता, सांस्कृतिक व सामाजिक राजकारणाची मोट नेटाने हाताळावी
भाजपाची एकाधिकारशाही माजली आहे. ती संपवण्यासाठी म्हणून बहुजनवादी चळवळीतील लोक ‘मविआ’चे समर्थन करीत आहेत. राजकीय अपरिहार्यता म्हणून हे ठिक आहे. पण ‘मविआ’च्या नादी लागून आपल्या सांस्कृतिक, सामाजिक संघर्षाचे राजकारण विसरता कामा नये. चळवळींनी ‘मविआ’त विरघळून न जाता, शिव-बसवण्णा-फुले-शाहू-आंबेडकर तसेच जिजाऊ-अहिल्या-झलकारी-सावित्री-फातिमा-रमाई च्या विचारांची नवी पिढी घडवली पाहिजे. ‘मविआ’ची राजकीय मशाल हाती घेताना आपल्या महामानवांच्या मशालीचा प्रकाश चोहोबाजूला पोहोंचेल यासाठी तत्पर राहिले पाहिजे. कारण, प्रकाशच आपल्या देशाला अघोरी अंधकारातून बाहेर काढणारा आहे. महामानवांच्या विचारांची प्रकाशवाटच आमच्या पुढच्या पिढ्यांच्या उद्धाराच्या दिशेने जाणारी आहे.
ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)



