७ जुन रोजी मकाई संघर्ष समिती ऊस बिलासाठी काढणार तिरडी मोर्चा, दशरथआण्णा कांबळे यांचा इशारा

करमाळा-प्रतिनिधी
मकाई सहकारी कारखान्याच्या ऊस बिलासाठी कित्येक महिने झाले, मकाई संघर्ष समितीच्या माध्यमातुन आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सनदशीर व नियमाला धरुन भांडत आहोत. परंतु मकाई कारखान्याचे तत्कालिन चेअरमन यांनी कारखान्यातील पैशाचा अपहार करुन, कित्येक शेतकऱ्यांच्या उध्वस्त कुटूंबाचे बागलांनी त्यांच्या माथ्यावर पाप घेतले आहे. मकाई कारखान्यातील ऊस बिलाविषयी कित्येकवेळा बागलांकडून फक्त तारखा देण्यात आल्या. परंतु त्या तारखा कधी बागलांच्या कॕलेंडरवर छापलेल्याच नव्हत्या! तरीसुद्धा तालुक्यातील शेतकरी सोशिक असल्यामुळे, आतापर्यंत त्याने बागलानी त्याच्याविषयी दाखविलेली कृतघ्न भावना सुद्धा सहन केली. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत कारखानदारीच्या माध्यमातुन, तालुक्यामध्ये जर अशाप्रकारे चुकीच्या प्रवृत्ती उपजत असतील. तर त्या आम्ही वेळेवरच ठेचुन काढण्याचे काम करणार आहोत. अशाप्रकारचा इशारा यावेळी दशरथआण्णा कांबळे यांनी दिला आहे.
तर पुढे बोलताना ते म्हणाले कि, सध्या संपुर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या आम्हाला कोणत्याही प्रकारचे आंदोलन करता येत नाही. परंतु येत्या ४ जुन रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याअनुषंगाने ७ जुन रोजी मकाई संघर्ष समितीच्या माध्यमातुन सर्व ऊस उत्पादक शेतकरी दिग्विजय बागल यांच्या निवासस्थानावर ‘अंतिम तिरडी मोर्चा’ काढणार आहोत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. तरी जोपर्यंत शेतकऱ्यांची बिले मिळणार नाहीत. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आचारसंहिता संपुष्टात आली कि आंदोलने, निषेध मोर्चे असे काढणार असल्याचे यावेळी कांबळे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे दि. २६ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या बैठकीसाठी, करमाळा तालुक्यातील ७०-८० शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. तरी या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथआण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ, ॲड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविंद्र गोडगे, प्रा. राजेश गायकवाड, शहाजी माने तसेच इतर ही प्रमुख शेतकरी उपस्थित होते.



