अकलूजमध्ये किरकोळ वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; लोखंडी पाईप आणि विटांनी हल्ला, एकाच कुटुंबातील ८ जणांवर गुन्हा दाखल!

Times 9 Marathi News Network
अकलूज : घरगुती आणि जुन्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाल्याची खळबळजनक घटना अकलूज येथील विकासनगर भागात घडली आहे. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांनी एका महिलेला, तिच्या भावाला आणि नातेवाईकांना लोखंडी पाईप व विटांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील महिलांसह एकूण ८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, विकासनगर, अकलूज येथे राहणाऱ्या फिर्यादी कु. गंगा आप्पा अवघडे (वय ३५) या दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या दरवाजासमोर उभा राहून भाऊ अधिक अवघडे याच्याशी फोनवर बोलत होत्या. याच वेळी त्यांच्या घराशेजारी राहणारी मिना रोहिदास पवार ही तिथे आली. “तू मला शिवीगाळ का करत आहेस?” असा जाब विचारत तिने वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढत गेल्यानंतर मिना पवार हिच्यासह तिची सून विशाखा पवार आणि राजश्री पवार या दोघी हातामध्ये विटा घेऊन त्या ठिकाणी आल्या. त्यांनी गंगा अवघडे यांना अश्लील शिवीगाळ करत विटांनी डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले.

बहिणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून भाऊ अधिक अवघडे आणि शेजारी राहणारे आरू अभिषेक मगर हे वाद सोडवण्यासाठी तात्काळ धावून आले. मात्र, वाद सोडवण्यास गेलेल्या अधिक अवघडे यांच्यावरही आरोपींनी हल्ला चढवला. यावेळी शेजारी राहणारे रोहिदास पवार, सिद्धार्थ पवार, शशिकांत पवार, नितीन सावंत आणि शिवराज पवार हे सर्वजण हातात लोखंडी पाईप घेऊन तिथे आले.
या सर्वांनी मिळून लोखंडी पाईपने अधिक अवघडे आणि गंगा अवघडे यांना पाठीवर, डोक्यावर, पायावर व हातावर बेदम मारहाण केली. “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.
या भीषण मारहाणीत अधिक अवघडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आंतररुग्ण म्हणून उपचार सुरू आहेत. तर गंगा अवघडे यांच्यावरही वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.
याप्रकरणी गंगा आप्पा अवघडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात खालील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१) मिना रोहिदास पवार
२) विशाखा पवार
३) राजश्री पवार
४) सिद्धार्थ रोहिदास पवार
५) शशिकांत रोहिदास पवार
६) रोहिदास पवार
७) नितीन सावंत
८) शिवराज पवार (सर्व रा. विकासनगर, अकलूज, ता. माळशिरस)
या घटनेची नोंद अकलूज पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



