पालघर जिल्ह्यातील केळवे अपघात प्रकरणी ठेकेदारावर गुन्हे दाखल करा… केळवे सरपंच संदीप किणी व ग्रामस्थ यांची मागणी…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवे संजीवनी मिठागर परिसरात सोमवारी रात्री अत्यंत दुर्दैवी अपघाती घटना घडली असून झालेल्या अपघातात केळवे येथील एका 51 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.
विपिन दत्तात्रेय सावे वय वर्ष 51 राहणार करंद आळी केळवे हा इसम सोमवार दिनांक 1 जून रोजी रात्री अकरा वाजता आपल्या मोटर सायकल वरून कामावरून घरी परत येत असताना सफाळे ते पालघर दरम्यान रस्त्याचे काम चालू असल्या कारणामुळे हे काम घेतलेल्या ठेकेदारांनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून या रस्त्यावर बॅरीकेट्स किंवा लालपट्टी सुरक्षा फलक आणि इशारा दिवे न लावता भर रस्त्यात साधन सामग्री आणि पोकलॅण्ड उभे केले होते.

हे भर रस्त्यात उभे असलेले हे पोकलँड अंधारामुळे विपिन सावे यांना न दिसल्यामुळे सोमवारी रात्री अकरा वाजता त्यांची मोटरसायकल केळवे संजीवनी मिठागर परिसरात आल्यावर या पोकलँड वर आदलून त्यांचा अपघात झाला या अपघातात त्यांना जबरी दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झालेल्या अपघाती मृत्युप्रकरणी संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत केळवे व सरपंच संदीप किणी यांच्यावतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांना पत्रक देऊन पोलिसांनी या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.



