महाराष्ट्र

रोहित पवारांच्या ‘अन्नत्याग’ आंदोलनाला पहिलं यश; वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सरकारचा निर्णय, पण आंदोलन होणारच!

Times 9 Marathi News Network

​पंढरपूर:२०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार रोहित पवार यांनी १२ जून रोजी पंढरपुरात पुकारलेल्या नियोजित ‘अन्नत्याग’ आंदोलनाचे हे पहिले यश मानले जात आहे. दरम्यान, हा निर्णय म्हणजे केवळ सुरुवात असून, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

​आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारवर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
​काय म्हणाले रोहित पवार?
​”२०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे १२ जून रोजी पंढरपुरात होणाऱ्या नियोजित अन्नत्याग आंदोलनाचं पहिलं यश आहे. यापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मी दोनदा उपस्थित केला होता आणि तो पूर्ण करण्याचं आश्वासनही सरकारने दिलं होतं.”

​…पण हे एवढंच पुरेसं नाही!
​सरकारने वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन वस्तुस्थिती स्वीकारली असली, तरी शेतकऱ्यांचे प्रश्न अजून पूर्णपणे सुटलेले नाहीत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी सरकारसमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
​सरसकट कर्जमाफी: कोणत्याही अटी व शर्तींशिवाय सर्व शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे.

​OTS ची अट रद्द करा: ‘एकवेळ ठेव योजना’ (OTS) साठी असलेली ५० हजार रुपयांच्या मर्यादेची अट तात्काळ रद्द करून, सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू करावी.
​इतर प्रलंबित मागण्या: शेतकऱ्यांच्या इतरही सर्व मागण्या सरकारने विनाविलंब मान्य कराव्यात.

​विठुरायाला साकडं!
​”अन्नदात्यासाठी (शेतकऱ्यांसाठी) हे अन्नत्याग आंदोलन असून, तत्पूर्वी या सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो,” अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.

​सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आंदोलनाला यश येत असल्याचे दिसत असले, तरीही जोपर्यंत सरसकट कर्जमाफी आणि इतर मागण्यांवर सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत १२ जूनचे पंढरपुरातील ‘अन्नत्याग आंदोलन’ नियोजित वेळेनुसार पार पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button