महाराष्ट्र

अकलूज नगरपरिषदेचा मोठा निर्णय: अनधिकृत फ्लेक्सबाजीला चाप; १३ चौकांत जाहिरातींसाठी जागा निश्चित, दरही ठरले!

Times 9 Marathi News Network

​अकलूज:अकलूज शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि विनापरवाना होणाऱ्या जाहिरातींना पायबंद घालण्यासाठी अकलूज नगरपरिषदेने कडक पावले उचलली आहेत. शहरात डिजिटल बोर्ड, फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर्स लावण्यासाठी १३ प्रमुख ठिकाणे (चौक) निश्चित करण्यात आली असून, यासाठी अधिकृत दरपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे आता अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर ५,००० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

​प्रमुख १३ ठिकाणांची निवड

​नगरपरिषदेने वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने शहरातील १३ जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये प्रतापसिंह चौक, सदुभाऊ चौक, विजयसिंह चौक, महर्षि चौक, जयसिंह चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, संत गाडगेबाबा चौक, आनंदनगर चौक, महाराणा प्रताप चौक, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, सावता माळी मंदिर परिसर आणि कर्मवीर चौक यांचा समावेश आहे. या ठिकाणी दिशा निश्चित करून देण्यात आल्या आहेत.

​असे असतील जाहिरातींचे नवे दर (प्रति स्के. फूट):

​जाहिरातींच्या प्रकारानुसार नगरपरिषदेने खालीलप्रमाणे दर निश्चित केले आहेत:

​व्यापारी (कमर्शियल) जाहिरात: १०/- रुपये

​महापुरुषांच्या फोटोंसह जाहिरात: ५/- रुपये

​महापुरुष जयंती व पुण्यतिथी: विनामूल्य (निशुल्क)

​श्रद्धांजली: ५/- रुपये

​शुभेच्छा फलक: २५/- रुपये

​विद्युत खांबांवरील (पोल) जाहिरात: २५/- रुपये

​नियम आणि अटी:

​१. : कोणत्याही तात्पुरत्या स्वरूपातील जाहिरात बोर्डाचे क्षेत्रफळ जास्तीत जास्त १०x२० स्के. फूट असावे.

२. : विद्युत खांबावरील जाहिरातींसाठी २x२ स्के. फूट ही कमाल मर्यादा असेल.

३. : नागरिकांना अशा जाहिराती लावण्यासाठी केवळ ७ दिवसांची मुदत दिली जाईल.

४. : शहरात विनामूल्य आरोग्य शिबिर किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रचारासाठी ५ बोर्डांना मोफत परवानगी दिली जाईल.

​विनापरवाना फ्लेक्स लावल्यास ५ हजारांचा दंड

​उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमानुसार, मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही पोस्टर किंवा बॅनर लावणे हा गुन्हा ठरणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासोबतच प्रत्येकी ५,००० रुपये दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा रेश्मा अडगळे उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील आणि नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button