महाराष्ट्र

​खळबळजनक: माळशिरसमध्ये शिक्षकांमधील राड्याने शाळा हादरली; विद्यार्थ्यांत भीती, तर पालकांमध्ये संताप!

संपादक नौशाद मुलाणी Times 9 Marathi News Network

​माळशिरस : विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या आणि संस्कारांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या माळशिरस येथील एका नामांकित आणि जुन्या शैक्षणिक संस्थेत दोन शिक्षकांमध्ये भर शाळेत राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पालकांनी शाळेच्या खालावलेल्या शिस्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या शिक्षक कक्षात (Staff Room) दोन शिक्षकांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक सुरू झाली. पाहता पाहता या वादाने रौद्र रूप धारण केले आणि प्रकरण थेट हमरीतुमरीवर व धराधरीपर्यंत पोहोचले.विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सुरू असताना जवळच विद्यार्थी उपस्थित होते. वादाचा आवाज इतका मोठा होता की वर्गात बसलेल्या मुलांपर्यंतही तो पोहोचला. आपल्या गुरूंना अशा प्रकारे भांडताना पाहून चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या मनात भीती भरली आहे.

​शाळा सुटल्यानंतर मुलांनी घरी घडलेला प्रकार सांगितल्यावर पालकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या शाळेचा इतिहास अत्यंत देदीप्यमान राहिला आहे. एकेकाळी पगार नसतानाही शिक्षकांनी निष्ठेने काम करून या संस्थेचे नाव तालुक्यात गाजवले होते. मात्र, आजच्या या प्रकारामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

​वेतनातील तफावत: काही शिक्षकांना पूर्ण पगार मिळतो, तर काहींना केवळ २५ ते ५० टक्के मानधनावर काम करावे लागते. या आर्थिक विवंचनेचा परिणाम शिक्षकांच्या अध्यापनावर आणि वर्तनावर होत असल्याची चर्चा आहे.
​’जादा तासां’चा जाच: ‘एक्स्ट्रा क्लास’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क उकळले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

जादा तासात शिकवलेला भाग नियमित वर्गात शिकवला जात नाही. त्यामुळे जे गरीब विद्यार्थी हे शुल्क भरू शकत नाहीत, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.​”शिक्षकांनी मर्यादा ओलांडली”​”विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांनीच जर आचारसंहिता धाब्यावर बसवली, तर मुलांनी कोणाचा आदर्श घ्यावा?” असा संतप्त सवाल एका पालकाने उपस्थित केला आहे. शिक्षकांच्या या अशा वर्तनामुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व गंभीर प्रकाराची शिक्षण विभागाने तात्काळ दखल घ्यावी आणि संबंधित दोषी शिक्षकांवर तसेच मनमानी कारभार करणाऱ्या संस्थाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरत आहे.
​आता सर्वांचे लक्ष शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे लागले असून, ही प्रतिष्ठित संस्था आपली प्रतिमा सावरण्यासाठी काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

​”या प्रकरणामागील नेमके कारण काय? वादात सामील असलेल्या शिक्षकांवर प्रशासन कोणती कारवाई करणार? तसेच शाळेतील ‘जादा तास’ आणि शुल्काबाबतच्या तक्रारींमागील सत्य काय? या सर्व बाबींचा सविस्तर उलगडा आम्ही करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाचे सविस्तर वृत्त आणि प्रशासकीय हालचालींची अपडेट्स ‘टाइम्स नाईन न्यूज मराठी’वर लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा, टाइम्स 9 न्यूज मराठी!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button