अकलूज नगरपरिषदेच्या ५० महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘मानवाधिकार संघा’तर्फे ओळखपत्रांचे वाटप

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : शहराचे आरोग्य राखण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना केवळ वेतन मिळणे पुरेसे नसून, त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवून त्यांना सर्व कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ (मानवाधिकार) सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी दिली.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघातर्फे अकलूज नगरपरिषदेतील ५० कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना संस्थेच्या ओळखपत्रांचे वाटप अमोल माने यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे (नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना माने यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की:सफाई कर्मचारी हे शहराचे खरे ‘स्वच्छता दूत’ आहेत, त्यांच्यामुळेच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते.कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाणारी पीएफची रक्कम कंत्राटदाराने नियमानुसार जमा करणे अनिवार्य आहे. तसेच, आरोग्य सुविधेसाठी प्रत्येकाला ईएसआयसी (ESIC) कार्ड मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार भरपगारी प्रसूती रजा मिळायलाच हवी.
”अकलूज नगरपरिषदेमध्ये कोणत्याही कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यावर अन्याय किंवा शोषण होत असेल, तर आमची संघटना ते सहन करणार नाही. त्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” – अमोल माने (पश्चिम भारत अध्यक्ष)

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालय अकलूजच्या इन्चार्ज सिस्टर सौ. सुनीता भालेराव उपस्थित होत्या. तसेच, सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. स्वाती अमोल माने, माळशिरस तालुका महिला अध्यक्षा सौ. अश्विनीताई पांढरे, सौ. वंदनाताई तिकोटे, संग्राम नगर शहर अध्यक्ष रोहित टेके आणि अभिषेक चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या.



