अकलूजमध्ये रमजान ईदचा उत्साह; मोहिते-पाटील परिवाराने मोहोळकर कुटुंबियांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट!

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : संपूर्ण महिनाभराच्या पवित्र उपवासानंतर आज मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी केली. अकलूजमध्येही हा सण सर्वधर्मीय बांधवांच्या उपस्थितीत सामाजिक सलोख्याने साजरा करण्यात आला. या निमित्ताने माळशिरस तालुक्याचे ‘जाणते राजे’ म्हणून ओळखले जाणारे जयसिंह मोहिते-पाटील (बाळदादा) यांनी हाजी दादाभाई मोहोळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मोहोळकर कुटुंबियांशी असलेले जुने आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जपत बाळदादांनी प्रत्यक्ष घरी येऊन शुभेच्छा दिल्याने मोहोळकर परिवाराचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी त्यांनी मोहोळकर कुटुंबियांशी संवाद साधून सणाचा आनंद लुटला.

या सदिच्छा भेटीवेळी युवक सम्राट तथा अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांनीही उपस्थित राहून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शेटफळ (मोहोळ) येथील मनोहरभाऊ डोंगरे यांचे नातू चि. पृथ्वीराजभैया डोंगरे यांनीही विशेष उपस्थिती दर्शवत शिर्खुर्मा पार्टीचा आस्वाद घेतला आणि संपूर्ण मोहोळकर परिवारास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी हाजी दादाभाई मोहोळकर,हाजी नाझीरभाई मोहोळकर, इम्रान मोहोळकर, अबरार मोहोळकर, झाहीद मोहोळकर यांनी आलेल्या मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. या आनंदाच्या क्षणी घरातील महिला वर्ग आणि लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमुळे या ईदच्या सोहळ्याची अकलूज परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.



