अकलूजच्या मक्का मशिदीत ईदचा उत्साह दुणावला; कुराण पठण करणाऱ्या हाफिज मेहमूद अन्सारी यांना १ लाखांचे मानधन आणि ‘उमराह’चे तिकीट भेट!

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : पवित्र रमजान महिन्याची सांगता आणि ईद-उल-फित्रच्या शुभ मुहूर्तावर अकलूज येथील महाळुंग रोडवरील ‘रत्नाई पार्क’ स्थित मक्का मशीद येथे एका अत्यंत स्तुत्य आणि अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभर तरावीहच्या नमाजमध्ये पवित्र कुराण पठण करणाऱ्या हाफिज महमूद अन्सारी यांचा मुस्लिम बांधवांनी तब्बल १ लाख १ हजार रुपये रोख आणि उमराहची वारी भेट देऊन गौरव केला.
रमजान महिन्यामध्ये उपवास (रोजे) आणि नमाज पठणाला विशेष महत्त्व असते. या काळात रात्रीच्या ‘तरावीह’ नमाजमध्ये कुराण ऐकणे, कुराण वाचणे पुण्यकर्म मानले जाते. मक्का मशिदीत रमजानच्या सुरुवातीलाच आलिम नियाज अहमद मौलाना यांनी कुराण पठणाचे महत्त्व पटवून दिले होते. तसेच, कुराण पूर्ण करणाऱ्या हाफिज यांना सन्मानपूर्वक भेट देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मक्का मशिदीचे ट्रस्टी आणि नमाज पठण करण्याकरिता येणाऱ्या सर्व नमाजी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नियोजनाप्रमाणे, दर शुक्रवारी नमाज पठणानंतर भाविकांनी आपापल्या परीने ‘रुमालात’ दान जमा करत गेले.आज ईदच्या दिवशी सकाळी फजरच्या नमाज पठणानंतर जेव्हा ही रक्कम मोजण्यात आली, तेव्हा ती तब्बल १ लाख १ हजार रुपये इतकी भरली. ही संपूर्ण रक्कम कुराण पठण करणाऱ्या हाफिज महेमूद अन्सारी यांना मानधन म्हणून मक्का मशिदीचे ट्रस्टी हाजी युसूफ भाई तांबोळी यांच्या हस्ते बहाल करण्यात आली.
विशेष म्हणजे, याचवेळी एका दानशूर मुस्लिम बांधवाकडून हाफिज यांना मक्का-मदिना (उमराह) यात्रेचे विमान तिकीट देखील भेट म्हणून देण्यात आले. नमाजसाठी आलेल्या प्रत्येक बांधवाने ‘फुल ना फुलाची पाकळी’ या भावनेतून हाफिज यांची गळाभेट घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावरही बिदागी दिली.
माळशिरस तालुका आणि अकलूज शहरात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आल्याने सर्व स्तरांतून ‘रत्नाई पार्क’ महाळुंग रोड अकलूज या मक्का मशिदीच्या ट्रस्टींचे आणि खास करून या मशिदीमध्ये नमाज पठण करिता येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांचे कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे पुढील वर्षी कुराण पठण करणाऱ्या हाफिजमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.



