यशवंतनगर पंचायत समिती गणात ‘क्रांतिकारी’ वारे; शिवराम गायकवाड यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल!

धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचे आव्हान; क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जिल्हा परिषद निवडणुकीत दमदार एन्ट्री
अकलूज (टाईम्स ९ मराठी न्यूज नेटवर्क):
बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. माळशिरस तालुक्यात आजवर मोहिते-पाटील विरुद्ध सर्व विरोधक असे समीकरण असायचे. मात्र, यंदा राजकीय पटलावर वेगळीच रंगत पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध मोहिते-पाटील गट आणि मित्रपक्ष अशी चुरस असतानाच, आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या निवडणुकीत उडी घेतल्याने लढत अधिक रंजक झाली आहे.
माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शेतकरी चळवळीतील आक्रमक नेतृत्व आणि ‘आधुनिक भगतसिंग’ म्हणून ओळखले जाणारे शिवराम गायकवाड यांनी ८६- यशवंतनगर पंचायत समिती गणातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अनेकांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्ती प्रदर्शन केले असताना, शिवराम गायकवाड यांनी मात्र शेतकरी बांधवांच्या आग्रहास्तव कोणताही गाजावाजा न करता, आदर्श आचारसंहितेचे पालन करत आपला अर्ज दाखल केला. छाननी प्रक्रियेत त्यांचा अर्ज मंजूर झाला असून, त्यांनी आता अधिकृतपणे निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिनिधींशी बोलताना गायकवाड यांनी स्थानिक कारखानदारांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की: उसाचे दर आणि काटामारी: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उसाचे दर, काटामारी आणि रिकव्हरी चोरीच्या माध्यमातून होणारी लूट थांबवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कामगार आणि वाहनचालकांचे प्रश्न: हार्वेस्टर चालक, ऊसतोडणी कामगार आणि ओव्हरलोड वाहतुकीच्या नावाखाली वाहनचालकांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी ही लढाई आहे.
सर्वसमावेशक विकास: दिव्यांग, कामगार, कलावंत, वारकरी आणि माता-भगिनींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही शेतकऱ्यांची भक्कम चळवळ आता गावागावात पोहोचणार आहे.
”शेतकऱ्यांच्या वेदना संपविण्यासाठी आम्ही आजवर रस्त्यावरची लढाई लढलो आहोत. आता ही लढाई सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढायची आहे. यशवंतनगर गणातील जनतेच्या आशीर्वादाने आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने जिंकू.”— शिवराम गायकवाड (अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना व उमेदवार)
शिवराम गायकवाड यांच्या एन्ट्रीमुळे यशवंतनगर गणात प्रस्थापितांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असून, लवकरच ते आपला ‘गावभेट दौरा’ सुरू करणार आहेत.



