गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात सफाळे पोलिसांना यश

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे आणि सागरी केळवा पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, अंगणवाड्या आणि कुलूप बंद असलेल्या बंगल्यांमधून गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील 25 गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि एक मोटरसायकल असा एकूण एक लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात सफाळे पोलिसांना बुधवारी यश आले आहे.
पालघर जिल्ह्यातील सागरी केळवा पोलीस ठाणे आणि सफाळे पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यांनी विविध अंगणवाड्या शाळा बंगले यांचे बंद दरवाजे तोडून गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी केल्याच्या तक्रारी सफाळे आणि केळवा पोलीस ठाण्यात दाखल केल्या होत्या.

या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाणे पोलिसांचे तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथक तपासाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके आणि तपासी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अजय एकनाथ आंबात ( 32 ) राहणार बदाडे पालघर आणि आरोपी चंदू रमेश वळवी वय (25 ) राहणार देवशेत पालघर या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील 25 गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि एक मोटरसायकल असा एक लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्याकडून त्यांनी केलेल्या चार गुन्ह्यांचे कबुली जबाब नोंद केले आहेत.
सदरची यशस्वी यशस्वी कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके , आणि गोपनीय विभाग पोलीस हवालदार कैलास शेळके व सफाळे पोलिसांनी केली आहे.



