शिवसेना (शिंदे गट) मधील अंतर्गत नाराजी उफाळली, युवासेना जिल्हा समनव्यक नैवेद्य संखे यांनी सोडले पद व पक्ष

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
शिवसेना(शिंदे गट) युवासेना जिल्हा समन्वयक (पालघर व डहाणू विधानसभा) नैवेद्य नरेंद्र संखे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील युवासेनेत खळबळ उडाली आहे. १ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना(शिंदे गट) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राद्वारे संखे यांनी आपला राजीनामा सादर केला.
राजीनामा पत्रात संखे यांनी नमूद केले आहे की पहिल्या दिवसापासून शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर माझा अखंड विश्वास राहिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मला एक कार्यकर्ता म्हणून ओळख सन्मान आणि प्रेरणा मिळाली. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना ‘शासन आपल्या दारी’, ‘लाडकी बहीण योजना’, ‘वयोश्री योजना’, ‘लेकी लखपती योजना’ यांचा प्रचार-प्रसार करून त्यांनी जनतेपर्यंत शासनाचे लाभ पोहोचवले.

मात्र अलीकडच्या काळात पक्षात घेतले जाणारे काही निर्णय हे निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. उबाठा पक्षातून आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जात असून आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांचा आवाज वारंवार दुर्लक्षित होत आहे. हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक रागातून नव्हे तर अंतर्मनातील वेदना आणि प्रामाणिक भावनेतून घेतलेला आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, शिंदे साहेबांनी दिलेल्या संधीबद्दल आणि शिकवलेल्या संघटनशक्तीबद्दल मी सदैव ऋणी राहीन असेही त्यांनी म्हटले आहे.
नैवेद्य संखे यांच्या या निर्णयाने शिवसेना(शिंदे गट) च्या पालघर जिल्हा संघटनेत अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
प्रतिक्रिया-
1)एकनाथ शिंदे जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा पालघर शहरात भाई समर्थक म्हणून सर्वात पहिलं बॅनर लावून त्यांना शुभेच्छा दिलं होत्या त्यावेळेस मला गद्दार म्हणणारे, त्या बॅनरवर टीका करणारे आज सगळे शिवसेना शिंदे गटात आहेत आता तेच जर खिश्यात तिकीट मिरवत फिरवून दाखवत असतील तर हे आपल्या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या खच्चीकरण आहे.
–नैवेद्य संखे- युवा सेना जिल्हा समनव्यक
2)या निवडणुकीच्या काळामध्ये आयाराम गयाराम खूप आहेत. आता भाजपचे 200 ते 250 कार्यकर्ते आमच्या पक्षात आले आहेत म्हणून हे प्रतिक्रिया देण्याऐवढं मोठा विषय नाही आहे.
–कुंदन संखे- शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख



