पालघर जिल्ह्यातील मुरबे गावात रात्री ड्रोनद्वारे बेकायदेशीर सर्वे? ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक – 8177805135
पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे सुरू असलेल्या संशयास्पद सर्वेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात ग्रामस्थांनी सातपाटी सागरी पोलीस ठाणेत लेखी तक्रार सादर करून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११:३० ते १:३० वाजेदरम्यान तीन ते चार मोठ्या आकाराचे ड्रोन मुरबे गावाच्या परिसरात फिरताना दिसले. हे ड्रोन मोठ्या आवाजात उडत होते आणि गावाच्या आतील भागाचे तसेच आजूबाजूच्या परिसराचे छायाचित्रण करत असल्याचे दिसून आले. ड्रोनचे उड्डाण रात्रीच्या वेळी झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट निर्माण झाली.
या ड्रोनचा उद्देश काय होता, आणि ते कोणत्या संस्थेकडून उडवले जात होते, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांमध्ये अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. काही ग्रामस्थांनी असा संशय व्यक्त केला आहे की, या ड्रोनद्वारे मुरबे परिसरात प्रस्तावित जिंदाल (JSW) पोर्ट प्रकल्पाचा बेकायदेशीर सर्वेक्षण सुरू असावे. या कारणास्तव लोकांच्या गोपनीयतेचा भंग होत असून, परिसरात असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
ग्रामस्थांनी या प्रकाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून, पोलिसांनी संबंधित ड्रोन कुठून येतात, कोण उडवत आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे, याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी अशा प्रकारे ड्रोन उडविणे हे कायदेशीरदृष्ट्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याने या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



