क्राईम

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या,२१ तक्रारी करूनही न्याय नाही, जीव गेल्यानंतर कारवाईचा देखावा!

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र, सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात त्यांनी शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.

​मृत डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा माझ्यावर वारंवार बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच प्रशांत बनकर (घर मालकाचा मुलगा) याने मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार,या महिला डॉक्टरने यापूर्वीही अनेकवेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या.
​डॉक्टरने तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले होते की,फलटण ग्रामीण पोलीस, विशेषतः उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे आणि उपनिरीक्षक बदने, रुग्णालयात पेशंट ‘फिट’ नसतानाही ‘फिट’ असल्याचा रिपोर्ट देण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव टाकत होते.
​याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक महाडीक यांना फोनद्वारे माहिती दिली असता,त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.

​१९ जून रोजी त्यांनी उपविभागीय पोलीस उपअधीक्षकांकडे लेखी तक्रार केली होती, ज्यात ‘माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन’ असे स्पष्टपणे नमूद केले होते.
​एका प्रकरणात पोलिसांनी त्यांना उच्च रक्तदाब असलेल्या आरोपीला उपचाराशिवाय ताब्यात देण्यासाठी ‘फिट’ घोषित करण्यास भाग पाडले होते.​या तक्रारींची दखल घेतली गेली नाही, तसेच त्यांच्याविरुद्ध उलट चौकशी सुरू करण्यात आली होती, ज्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या.

​त्यांच्यावर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात होता, असाही आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. एका खासदाराने तर चक्क फोन करून फिटनेस सर्टिफिकेट न दिल्याबद्दल त्यांना लक्ष्य केल्याचेही उघड झाले आहे.

​डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
​आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि बलात्काराचे गुन्हे (भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(N), 108 नुसार) नोंदवले गेले आहेत.
​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

​आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला निलंबित करण्यात आले आहे आणि तो सध्या फरार आहे.तर
​दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

​डॉक्टरने वारंवार तक्रार करूनही वेळेवर कारवाई न झाल्याबद्दल आणि जीव गमावल्यानंतर केवळ देखावा म्हणून कारवाई सुरू केल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि छळामुळे ही घटना घडल्याचे सांगत, कठोर कारवाईची आणि एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

​या घटनेमुळे पोलीस आणि आरोग्य व्यवस्थेतील गैरव्यवस्थेवर तसेच निरपराधांना त्यांच्या हयातीत न्याय न मिळण्याच्या प्रवृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button