रेल्वे प्रश्नाबाबत पाटील गट गंभीर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना इशारा.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
रेल्वे प्रश्न तातडीने नाही सुटल्यास जनतेची नाराजी आगामी लोकसभा निवडणुकीत भोवणार असल्याचे संकेत पाटील गटाकडून देण्यात आले. सध्या सन 2019 पासून जेऊर, केम, पारेवाडी आदि ठिकाणचे रेल्वे बाबतचे प्रश्न सुटले गेले नाहीत. यावरुन आज माजी आमदार नारायण पाटील गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. रेल्वे प्रश्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अधिकारक्षेत्रात अर्थात केंद्र शासनाशी निगडीत आहे.
याबाबत सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की सन 2019 च्या निवडणुकीत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना करमाळा मतदार संघातून मताधिक्य देण्यात माजी आमदार नारायण पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे.यामुळे करमाळा मतदार संघातील रेल्वे विभागास निगडीत समस्या सोडविण्यासाठी खासदार महोदयांकडून जनतेने अपेक्षा ठेवणे गैर नाही. जेऊर रेल्वे स्टेशन हे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील वेगाने विकसित होणारे रेल्वे स्टेशन आहे.
रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या नोंदी रेल्वे विभागाकडे आहेत. सन 2019 पुर्वी अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना जेऊर रेल्वे स्थानकावर थांबा दिला गेला होता. परंतू कोरोना कालावधी संपल्यानंतर अचानक रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाडी थांबा, प्रवाशी डब्यांची संख्या यात अग्रमुल बदल केले व याचा फटका जेऊर तसेच करमाळा शहर व एकुणच तालुक्यातील तीस गावातील रेल्वे प्रवाशांना बसला. जेऊर व करमाळा प्रवाशी संघटनांनी काही गाड्यांना जेऊर येथे थांबा मिळावा, दैनंदिन प्रवाशांसाठी वाढीव व राखीव भोगी अर्थात डब्बे असावेत. या मागण्या करुन याचे निवेदन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.
सध्या जेऊर येथे मोजक्याच गाड्यांना थांबा असून केवळ एसी डब्बे पर्यायी म्हणून दिले आहेत. एसी तिकीटाचा जेऊर ते पुणे प्रवास हा परतीसह बेरजेत धरला तर विमान प्रवासाच्या तिकीखर्चा इतपत महाग पडत आहे. सर्वसामान्य व गरीब प्रवाशांना याचा खर्च पेलवणार नाही. हि बाब गंभीर असुन व्यापारी, छोटे व्यावसायिक, विद्यार्थी, पालक, रुग्ण, जेष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, नोकरदार आदि रेल्वे प्रवाशांवर अन्याय करणारी आहे.
जेऊर व करमाळा प्रवाशी संघटनांनी दिलेल्या निवेदनांचा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गंभीरतेने विचार करुन रेल्वे विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना व वेळ पडलीच तर केंद्रीय रेल्वेमंत्री यांना साकडे घालून हा प्रश्न तातडीने सोडवावा. वास्तविक पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडून नवीन रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती.
परंतू किमान रेल्वे गाड्यांना थांबे व विशेष डब्बे या मागण्या सुध्दा पुर्ण होत नाहीत यावरुन जनतेत खास करुन मतदार वर्गात नाराजी वाढतच चालली असून वेळीच ही नाराजी कामांची पुर्तता करुन दुर न केल्यास याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसण्याचे स्पष्ट संकेत तळेकर यांनी दिले.



