जिल्हा अग्रणी बँक व बँक ऑफ महाराष्ट्र आणि आर.बी.आय,मुंबई यांच्या मार्फत विक्रमगड येथे इलेक्ट्रॉनिक पेमेंट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्हा विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभा येथे जिल्हा अग्रणी बँक (बँक ऑफ महाराष्ट्र), आर्थिक साक्षरता सल्ला केंद्र, पालघर आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “वित्तीय समावेशन” व “इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली – जागरूकता व प्रशिक्षण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिला, शेतकरी, विद्यार्थी, इतर नागरिक व शासकीय अधिकारी यांना डिजिटल व्यवहारांची सखोल माहिती देणे व व्यवहाराच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता.कार्यशाळेत UPI, IMPS, NEFT, RTGS, QR कोड व्यवहार तसेच सायबर सुरक्षेच्या उपाययोजना याबाबत RBI मुंबईचे तज्ज्ञ मार्गदर्शक जय नायक व आकाश झाडे यांनी सविस्तर माहिती दिली.

अग्रणी बँक व्यवस्थापक विशाल वाघ व आर्थिक साक्षरता सल्लागार उज्ज्वला कोकणे यांनी बँकेच्या सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक कर्ज, तसेच अन्य शासकीय बँक योजनांची माहिती दिली.
बँक ऑफ महाराष्ट्र, विक्रमगड शाखेचे व्यवस्थापक नीलेश गवळी यांनी खात्यांमध्ये KYC अद्ययावत करणे आणि नामांकनाची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सहभागी नागरिकांनी डिजिटल व्यवहारांमधील अडचणी, शंका व अनुभव यावर मोकळेपणाने चर्चा केली.

कार्यक्रमाच्या शेवटी विशाल वाघ यांनी सांगितले की, “देश डिजिटल अर्थव्यवस्थेकडे झपाट्याने वाटचाल करत असून, प्रत्येक नागरिकाने डिजिटल व्यवहार आत्मसात करून सुरक्षित व पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी बँक मेळाव्यांत सहभागी होऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना यांचा लाभ घेण्यासाठी बँके मध्ये खाते उघडणे आवश्यक आहे.”



