महाराष्ट्र

कृती समितीच्या आक्रमक भूमिकेपुढे टोल प्रशासन नरमले : स्थानिकांना पुन्हा आजपासून टोल माफी

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल

शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी दि. ०२ एप्रिल २०२३ रोजी पुकारलेल्या जनआंदोलनानिमित्त जिल्हाप्रशासनातर्फे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच शिवापूर टोलनाक्यामुळे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कृती समितीने आक्रमकपणे भूमिका मांडली.

या बैठकीत भोर वेल्हा मुळशी तालुक्याचे आमदार संगमदादा थोपटे यांनी १६ फेब्रुवारी २०२० रोजी कृती समितीने टोलनाक्यावर केलेल्या आंदोलनाच्या दरम्यान टोल प्रशासनाने टोलनाका स्थलांतरित होत नाही तो पर्यंत टोल वसुली करणार नाही अशी भूमिका घेतली होती व तसे पत्र कृती समितीला दिले होते. मात्र हि टोलवसुली पुन्हा सुरु करण्यात आली आहे. हि टोलवसुली तात्काळ थांबवावी व टोलनाका स्थलांतराचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

कृती समितीच्या वतीने कृती समितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांनी सदरचा टोलनाका हा PMRDA च्या हद्दीत येत असून वाढती नागरिकीकरण व औद्योकीकरण या भागात झाले आहे. सबब हा टोलनाका या ठिकाणावरून स्थलांतरित होण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलने सन २०११ पासून येथे झालेली आहेत. म्हणून या टोलनाक्याचे स्थलांतर होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यावर टोल प्रशासनाचे अधिकारी अमित भाटिया यांनी “टोलनाका स्थलांतर करण्यास आमची तयारी आहे मात्र याबाबत NHAI ने निर्णय घ्यावा” अशी भूमिका मांडली. यानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये असे आवाहन कृती समितीला केले. यावेळी बोलताना “टोलनाका स्थलांतराचा प्रस्ताव आता मी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे पाठवणार आहे याबाबत संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून ३० मार्च २०२३ रोजी पुढील बैठकीचे नियोजन करण्यात येईल”. यानंतर जोपर्यंत टोलनाका स्थलांतराचा निर्णय होत नाही तो पर्यंत स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी टोल प्रशासनाने मान्य करत एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे कृती समितीने दि. ०२ एप्रिल २०२३ रोजीचे जनआंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आजच्या बैठकीमुळे भोर, वेल्हा, मुळशी, हवेली, पुरंदर या तालुक्यातील नागरिकांना अधिकृत ओळखपत्र दाखवून टोलनाक्यावरून टोल मधून सूट मिळणार आहे. याबाबत निर्णय झाला असला तरी टोलनाका स्थलांतराबाबत NHAI ने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास कृती समिती कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यास तयार आहे. अशी भूमिका शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने जाहीर केली आहे.

या बैठकीस प्रशासनाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्गाने प्रकल्प संचालक संजय कदम,अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, हवेली प्रांत अधिकारी संजय असवले, भोर प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे तसेच कृती समितीच्या वतीने आमदार संग्रामदादा थोपटे, कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर, डॉ. संजय जगताप, भोर काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनावणे, भारतीय जनता पक्षाचे भोर तालुक्याचे उपाध्यक्ष राजेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभेचे युवक अध्यक्ष स्वप्नील कोंडे, शिवसेनेचे आदित्य बोरगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पांगारे, राष्ट्रशक्ती संघटनेचे शहाजी आडसूळ, गोरख मानकर, शुभम यादव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button