“दऱ्या” तून परतताच एकनाथ शिंदे यांचे “हिंदुत्व” पुरोगामी होईल…?

🎯 साताऱ्याच्या दऱ्यात “पुरोगामी हिंदुत्वाची” स्क्रिप्ट लिहली जातेय का…?
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर या ‘संविधान दिवस’ असलेल्या दिवशी संपला आहे.संविधान दिवस साजरा झाला.पण इथे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याचा कुणी दावा सुद्धा केला नाही व तरीही राज्यपालांनी ‘राष्ट्रपती राजवट’ जाहीर करण्याचा कोणताही अहवाल,सल्ला किंवा शिफारस राष्ट्रपतींकडे केलेली नाही.हे सगळे संविधानिक प्रक्रियेत बसत नाही आणि असंवैधानिक सुद्धा ठरते…
काळजीवाहू मुख्यमंत्री यांनी तब्येतीचे कारण सांगत कालच साताऱ्यातील “दरे” गाव गाठले असुन या मुळे महायुतीची होणारी बैठके सुध्दा रद्द करण्यात आली आहेत,महाराष्ट्राच्या राजकारणाला अचानक ब्रेक लागल्याने राजकारणातील अनेक “प्रकांड पंडित” सध्या चिंतेत पडलेले आहेत…
इकडे महाविकास आघाडी E V M च्या धक्क्यातून सावरायला काही तयार नाहीये,नाना पटोले,संजय राऊत,जितेंद्र आव्हाड यांच्या सह अनेकांच्या भुमिका नेहमी प्रमाणेच न पटणाऱ्या ठरत आहेत…
फक्त अजित दादा पवार यांचे ग्रहमान सध्याच्या घडीला “बुलंदी” वर आहेत असे वाटत असले तरी संजय शिरसाट यांच्या आजच्या वक्तव्याने त्यांचें हि “तारे जमीं वर” यायला उशीर लागणार नाहीत,कारण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई येथे परत येई पर्यंत त्यांचे “हिंदुत्व” हे पुरोगामी विचारांचें झाले असेल अशी परिस्थिती केंव्हा हि निर्माण होऊ शकते…
आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची परिस्थिती आहे आणि लागलेली राष्ट्रपती राजवट सरकार स्थापन होतांना रद्द सुध्दा करता येते हे बहुधा राज्यपाल महोदयांना माहीत नसेल,परंतु महाराष्ट्राला असे वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री “दऱ्या” त काय करत असतील…? असा प्रश्न पडतो…असो…
संविधानाचा कैवार घेणारे कोण-कोण याबाबत बोलत आहेत हे तपासणे गरजेचे झाले आहे,संविधान केवळ निवडणूक प्रचार काळात बोलण्याचा विषय झाला आहे का..? असा प्रश्न पडणे आता स्वाभाविक आहे…
“नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न” अशी एक म्हण आहे,म्हणूनच की काय “अमावशा” सुध्दा शनिवार रविवार गाठून आली असुन या मुळे शपथविधी लांबणीवर पडल्याचे पहायला मिळत आहे…



