लोकनियुक्त सरपंच पालघर तालुक्याला बनवणार विकासाचे मॉडेल

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर तालुका विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी सरपंचांनी एकत्र येऊन गावगाडा हाकण्याचा निर्धार केला असून सरपंचांना असलेले अधिकार, विकासाचे प्रारूप तयार करण्यासाठी सरपंचांना दिशा देण्यासाठी सरपंच परिषदेचे अध्यक्ष हेमंत संखे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनीच पालघर पंचायत समितीत ही बैठक बोलवली होती.पालघर तालुक्यात 133 ग्रामपंचायती असून सरपंचांच्या बैठकीला सुमारे 80 ग्रामपंचायतीचे सरपंच यावेळी उपस्थित होते. गावगाडा कसा चालवायचा, गावातील प्रश्न कसे सोडवायचे, अधिकाऱ्यांचा विश्वास कसा संपादन करायचा गावाच्या विकासासाठी निधी कुठून आणायचा याबाबत अनेक सरपंच अनभिज्ञ असतात. सरपंचांची पालघर जिल्ह्यात प्रभावी अशी संघटना नाही. त्यामुळे संखे यांनी पालघर पंचायत समितीच्या सभागृहात याबाबतची माहिती देण्यासाठी सरपंचांना एकत्र येण्याच आवाहन केले होते.सरपंच हा ग्रामविकासाचा दूत असतो. लोकांतून तो निवडून येत असतो. त्यामुळे लोकांच्या विकासाची जबाबदारी त्याच्यावर असते. या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंचाने कुठल्याही राजकीय पक्षाची बूज न ठेवता केवळ ग्राम विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे, असा सल्ला या परिषदेत संखे यांनी दिला. राज्यात हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, पाटोदे अशा गावांनी दिलेली दिशा लक्षात घेऊन विकासाची दिशा घ्यावी अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली.पालघर ग्राम विकासासाठी जे लोकप्रतिनिधी सरपंचांना सहकार्य करतील, त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय सरपंच परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

त्याच बरोबर जे लोकप्रतिनिधी सरपंचांच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांना कायमचा धडा शिकवण्याचा निर्धार सरपंचांनी या परिषदेत केला. गाव गाड्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक असते, जे लोकप्रतिनिधी ग्रामविकासाच्या कामासाठी सरपंचांना सहकार्य करतील, त्यांच्या पाठीशी राहण्याचा आणि सहकार्याची भूमिका न घेणाऱ्यांना धडा शिकवायचा निर्धार या वेळी करण्यात आला.सरपंचांना आपल्या शक्ती आणि बळाचा विसर पडू नये, याची शिकवण या वेळी देण्यात आली. ग्रामपंचायतींना केंद्र सरकारकडून थेट मिळणारा निधी, सरपंचांचे अधिकार, त्यांचे काम, ग्रामविकासाचे विविध प्रस्ताव, वेगवेगळ्या मार्गांनी मिळणारा निधी, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अडचणी आदी बाबतीत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.



