महाराष्ट्र

करमाळा तालुक्यातील आठ पैकी चार गावांना ग्रामपंचायत कार्यालय मंजूर माझ्या प्रयत्नाने झाले विद्यमान आमदार आयत्या पिठावर रेघोट्या मारून दिशाभूल करीत आहे,माजी आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातील आठ पैकी चार गावांना ग्रामपंचायत कार्यालय मंजूर माझ्या प्रयत्नातून झाले, विद्यमान आमदार आयत्या पीठावर रेघोट्या मारुन दिशाभुल करत असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक सविस्तरपणे माहिती देताना पाटील यांनी सांगितले की विद्यमान आमदार आता निवडणुकीच्या मोड मध्ये असून मी मागणी केलेल्या आणि कार्यवाही करण्यात आलेल्या कामांची माहिती घेऊन सदर कामे आपण स्वतः मंजूर करुन आणली असे मतदार संघात प्रसिध्दी माध्यमातून सांगत आहेत.

ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. करमाळा तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय नसल्याने अथवा उपलब्ध आहे ते जूने आणि धोकादायक झाले आहे अशा आठ गावांसाठी प्रत्येकी २८ लाख रुपये निधी मिळावा म्हणुन आपण शासनाकडे मागणी केली होती. यासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतुन करमाळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायत साठी निधी मिळावा म्हणुन दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी पत्र (जावक क्रमांक ६७४) पत्र दिले. यावर दस्तुरखुद्द मंत्री महोदयांनी ग्रामविकास सचिव यांना कार्यवाही करावी असे आदेश दिले.

आणि या पत्रानुसार आपण कोंढेज, कुंभेज, पिंपळवाडी, हिवरवाडी, वडगाव, बिटरगाव श्री, वडगाव द आणि हिंगणी या गावांसाठी सदर योजनेतुन ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करण्यात यावे अशी मागणी केली होती. यापैकी आपल्या पत्रानुसार कोंढेज,हिवरवाडी, वडगाव, बिटरगाव श्री या गावांसाठी ग्रामपंचायत कार्यालये मंजूर करण्यात आली. तशा प्रकारची माहिती सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठविण्यात आली. परंतु तरीही विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे या चार गावांसाठी ग्रामपंचायत कार्यालय आपण मंजुर करुन आणले असे सांगत आहेत ही बाब धादांत खोटी आहे.

यासारखी अनेक कामे येत्या काही दिवसांत विद्यमान आमदार आपणच मंजूर करुन आणली असे सांगत पाच वर्षातील आपली निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न करतील पण जनतेसमोर आता त्यांचे प्रगतीपुस्तक उघडपणे मांडले गेले आहे. यामुळे अशा दिशाभूलीस करमाळा तालुक्यातील जनता कधीच भुलणार नसल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी ठामपणे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button