आश्रमशाळांचे नवीन वेळापत्रक बदला…जव्हार प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.
आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळापत्रकामध्ये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात दिनांक १० जुलै २०२३ पासून बदल करून शाळेची वेळ सकाळी ८.४५ ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत अशी केली आहे. नविन बदललेल्या वेळेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी शालेय प्रशासन व शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सकाळी ८.३० वाजता वर्गात बसणारा विद्यार्थी सायंकाळी ४ वाजेपर्यंत थकून जातो. त्याची अध्ययनासाठी शारीरिक व मानसिक क्षमता राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या आश्रमशाळा एकाच वेळेस भरतात. त्यामुळे लहान
वर्गातील विद्यार्थ्याची मात्र खूपच कुचंबना होत असल्याचे दिसत आहे. जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळामध्ये निवासी विद्यार्थ्यांबरोबरच मोठ्या संख्येने डेस्कॉलर विद्यार्थी पाच ते सात किलोमीटर अंतरावरून ये-जा करतात. ग्रामीण भागात वाहतुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे या विद्यार्थ्यांना खूपच लवकर घरून निघावे लागते. बहुतांश वेळा हे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाहीत.
त्यामुळे त्यांचे अभ्यासाचे नुकसान होत आहे. हे नविन वेळापत्रक विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक थकवा आणणारे तसेच त्यांचे आरोग्य बिघडवणारे व त्यांच्या अध्ययन अध्यापनावर ताणतणाव निर्माण करणारे असल्याची सद्यस्थिती आहे. निवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत.. बहुतांश आश्रमशाळा ग्रामीण अतिदुर्गम भागात आहेत. तेथे पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत कर्मचारी संख्या अपूर्ण आहे अशा परिस्थितीत बदललेल्या वेळापत्रकामुळे आश्रमशाळांचे नियोजन कोलमडले आहे. हे नविन वेळापत्रक रद्द करून पूर्वीप्रमाणेच वेळापत्रक लागू करावे अशी मागणी पालक, विविध शिक्षक, शिक्षक व विद्यार्थी करीत आहेत.



