हजारो कृषी सेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत!

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषी सेवक पदाच्या ४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कृषी सेवक पदासाठी IBPS द्वारे घेण्यात आलेली, ही दि. १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी १५५५ जागासाठी ( अनुसूचित क्षेत्रातील जागा वगळता ) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. तसेंच १६ मार्च २०२४ रोजी सर्व विभागातील कृषी कार्यालयानी आपली तात्पुरता निवड यादी जाहीर केली आहे आणि १जून २०२४ ते २ जून २०२४ दरम्यान कागदपत्र पडताळणी पुर्ण करण्यात आली. पण पुढील अंतिम यादी अजूनही प्रसिद्ध झालेली नसून नियुक्ती कधी होईल हा प्रश्न उमेदवाराना पडला आहे. या पदाची निवड झालेले बरेचसे उमेदवार हे शेतकरी कुटुंबातील आहेत आणि अतिशय प्रामाणिक मेहनत करून इथपर्यंत पोहचले आहेत.

अंतिम निकाल व अंतिम नियुक्ती प्रक्रियेची उमेदवार वाट पाहत आहेत, मात्र कृषी विभागाचा संथ कारभार यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. कृषी सेवक / कृषी सहाय्यक पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून ही पदे लवकरात लवकर भरली गेल्यास कृषी विभागावरचा अतिरिक्त भार कमी होऊन शेतकऱ्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लागतील. मान्सून आगमन झाले असून काही भागात लागवडीला सुरुवात झाली आहे, अश्या वेळी नवीन कृषी सेवकांच्या नियुक्ती लवकर झाल्यास कृषी विभागाला फायदा होईल. त्यामुळे या संदर्भात शासनाने जलद प्रक्रिया करावी अशी मागणी निवड झालेले उमेदवार करीत आहेत.



