खासदार व आमदार यांची गळाभेट होऊनही जातेगाव टेंभुर्णी-रस्त्याचे काम सुरू का नाही – सुनील तळेकर
करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
जातेगाव टेंभुर्णी-रस्ता आमदार संजयमामा शिंदे यांनी जाणीवपूर्वक केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला, पाच वर्ष पूर्ण होत आली तरी कामास मुहूर्त सापडेना असा आरोप पाटील गटाकडून करण्यात आला. याबाबत सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की, अगोदरच चौपदरी, सहा पदरी या गोंधळात अनेक वर्ष रखडलेला जातेगाव टेंभुर्णी-रस्ता हा आजही कामाच्या प्रतीक्षेत आहे. वास्तविक जातेगाव टेंभुर्णी-रस्ता हा राज्य सरकारच्या निधीतून पूर्ण झाला पाहिजे होता. पण तरीही तो आमदार महोदयांनी जाणीवपूर्वक केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला. यानंतर आता या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असे बोलले जाते आणि बॅनर बाजी केली जाते. मग काम कधी सुरू होणार हा प्रश्न उरतो. टक्केवारी मुळे तर या कामास दिरंगाई होत नाही ना अशी शंका आता जनतेच्या मनात येत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी त्यांच्या काळात केंद्र सरकार कडे पाठपुरावा करून आणि निधी मंजूर करून घेऊन कोर्टी-जिंती- टाकळी हा रस्ता पूर्ण करून दाखवला.
पण आमदार संजय मामा शिंदे यांना पाच वर्ष झाली तरी एकच रस्ता पूर्ण करता येत नाही. विद्यमान खासदार आणि आमदार यांची गळाभेट झाली तरी या कामास वेग का येत नाही ? करमाळा तालुक्यातील एकमेव असा मोठा आणि महत्त्वाचा हा रस्ता राजकीय आळसा मुळे पूर्ण होत नाही की जाणीवपूर्वक पूर्ण होऊ दिला जात नाही हा संशोधनाचा भाग आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या कामाचा पाठपुरावा करण्यात आमदार संजय मामा शिंदे हे कमी पडले आहेत. केवळ बॅनर बाजी करून या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा पाठपुरावा केला असता तर काम वेळेत पूर्ण झाले असते. लोकसभेची आचार संहिता तोंडावर असताना प्रचारात जातेगाव टेंभुर्णी-रस्ता हा मुद्दा जनतेकडून विचारला जाणार असल्याचे संकेत तळेकर यांनी दिले.