अकलूज: रस्ते दुरुस्त करा, अन्यथा अन्नत्याग उपोषण! नगरसेवक महेश शिंदे यांचा प्रशासनाला इशारा

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : अकलूज नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सुरू असलेल्या विकासकामामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले. “येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी रस्ते पूर्वस्थितीत न झाल्यास अन्नत्याग उपोषण करू,” असा थेट इशारा नगरसेवक महेश शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील नवीन बाजार तळासह संपूर्ण परिसरात सध्या अंडरग्राउंड ड्रेनेज आणि एचडीपीई पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत, मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने आणि खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्यामुळे या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या:
संबंधित ठेकेदाराने सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करावे.
खोदलेले सर्व रस्ते दर्जेदार पद्धतीने पुन्हा पूर्वस्थितीत करण्यात यावेत.
पावसाळा तोंडावर असल्याने चिखल आणि पाण्याचे साचणे टाळण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्ती व्हावी.
”कामाच्या नावाखाली नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात येत आहे. जर प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही आणि रस्ते दुरुस्तीत विलंब केला, तर आम्हाला लोकशाही मार्गाने अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल.” — महेश शिंदे, नगरसेवक
निवेदन देतेवेळी भाजप गटनेते राहुल लोंढे, सरचिटणीस अमोल माने, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, शंकर मस्के यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने आता या इशाऱ्याची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी प्रभागातील रस्त्यांचे भाग्य उजळणार का, याकडे अकलूजकरांचे लक्ष लागले आहे.



