शहर

पालघरमध्ये २०० खाटांचे स्वतंत्र ‘रेडिएशन आपत्कालीन रुग्णालय’ उभारा….खासदार हेमंत सवरा यांची लोकसभेत मागणी

​टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा केंद्राचे संवेदनशील स्वरूप आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता पालघर जिल्ह्यात प्राधान्याने २०० खाटांचे सुसज्ज ‘रेडिएशन आपत्कालीन रुग्णालय’ उभारण्यात यावे अशी महत्त्वपूर्ण मागणी खासदार हेमंत विष्णू सवरा यांनी लोकसभेत केली आहे. ‘नियम ३७७’ अन्वये त्यांनी केंद्रीय गृह व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांचे या गंभीर आणि तातडीच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे.

खासदार सवरा यांनी लोकसभेत सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थित आहे. या अत्यंत संवेदनशील आणि धोरणात्मक आस्थापनेची उपस्थिती पाहता आसपासच्या भागात कोणत्याही संभाव्य रेडिएशन (किरणोत्सर्ग) किंवा अणु-आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अद्ययावत, प्रगत आणि विशेष वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने’ (NDMA) आयोजित केलेल्या रेडिएशन पूर्वतयारी बैठकीतही अणुप्रकल्पांच्या आसपास आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला होता याची आठवण खासदार सवरा यांनी करून दिली.
​वेळेचा अपव्यय टाळण्याची गरज: सध्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील विशेष वैद्यकीय संस्थांमध्ये न्यावे लागते. मुंबईला पोहोचण्याच्या या प्रवासात रुग्णांचा बराच मौल्यवान वेळ वाया जाण्याची शक्यता असते, जे आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यंत धोकादायक ठरू शकते. म्हणून पालघर जिल्ह्यात 200 खाटांचे स्वतंत्र अत्यावश्यक हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रशासकीय मंजुरी आणि आर्थिक तरतूद तातडीने करण्यात यावी अशी मागणी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button