स्वप्ने साकार करताना सत्यात उतरविण्यासाठी संघर्ष करा- डॉ. संभाजी राऊत
अकलूज प्रतिनिधी
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक त्या सर्वांना.. ज्यांनी भारत देश घडवला..
अकलूज-येथील सदाशिवराव माने विद्यालयात देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.या राष्ट्रीय कार्यक्रमाचे ध्वजारोहण अकलूजचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. संभाजी राऊत, डॉ. सौरभ गांधी या मान्यवरांच्या शुभहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, प्रशाला समितीचे सदस्य इक्बाल काझी, मनोज रेळेकर, माता पालक,शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्य वृंदाने बहारदार आवाजात राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत सादर केले. यानंतर बँडपथकाच्या तालासुरात विद्यालयाच्या एनसीसी, आरएसपी, स्काऊटच्या पथकांनी नेत्रदिपक असे संचलन केले. संचलनानंतर विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायतीचे सादरीकरण केले.यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी केले. त्यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन त्याचे महत्व विषद केले. पुढे बोलताना यावर्षी विद्यालयाने कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक सह विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केली असून सर्वत्र उज्वल यश संपादन केले असल्याचे सांगितले. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे व बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यामध्ये संग्रामसिंह मित्र मंडळ अकलूज ने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकवलेल्या खेळाडूंना व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज ने आयोजित केलेल्या समूह नृत्य स्पर्धेत क्रमांक पटकविलेल्या कलाकारांना तसेच विज्ञान प्रदर्शन, शाळांतर्गत वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, चित्रकला इ. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे व लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संभाजी राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संविधानाचे महत्त्व सांगून त्याची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये सांगितली. विद्यालयाच्या उज्वल परंपरेचे कौतुक करताना विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. माझ्या यशात विद्यालयाचा मोलाचा वाटा असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळण्यासाठी छोटे-छोटे टप्पे ठेवून ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करावे. स्वप्ने साकार करताना सत्यात उतरण्यासाठी संघर्ष करा. परिस्थितीचे भांडवल न करता आत्मविश्वासाने कठीण प्रसंगाला सामोरे जावे असा सल्ला दिला. यानंतर डॉ. सौरभ गांधी यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलन, सामुदायिक कवायतीचे, सांस्कृतिक गीताचे, लेझीमचे कौतुक केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, विनायक रणवरे, पर्यवेक्षक उमेश बोरावके, राजन चिंचकर, प्रमिला राऊत, शिक्षक प्रतिनिधी संजय नागणे, धनंजय मगर, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अंजली कदम, स्वाती अनभुले यांनी केले. कार्यक्रमांची सांगता ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने झाली. खाऊ वाटपाने कार्यक्रमाचा शेवट गोड करण्यात आला.